जॅकलिन फर्नांडिसला मातृशोक, कर्करोगाशी झुंज अपयशी; लिलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जॅकलिनची आई किम फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांना कर्करोग झाला होता. तब्येत बिघडल्याने 24 मार्च रोजी त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 13 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी 6 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

कर्करोगाने ग्रस्त असलेल्या किम फर्नांडिस यांना हृदयासंबंधी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने आईच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली होती.

आईची तब्येत बिघडल्याचे कळताच ती काम सोडून तात्काळ मुंबईत परतली होती. आयपीएलमध्ये तिने परफॉर्मन्सही केला नव्हता. 26 मार्चला राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स लढतीदरम्यान तिचा शो आयोजित करण्यात आलो होता. मात्र आईची तब्येत बिघडल्याने ती तात्काळ मुंबईत पोहोचली होती.