मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: जॅकलीन फर्नांडिसला ईडीचे समन्स

सक्तवसुली संचालनालयाने (ED) बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला बुधवारी 200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.

38 वर्षीय श्रीलंकन ​​वंशाची अभिनेत्री जॅकलीनची केंद्रीय तपास यंत्रणेने अनेक वेळा चौकशी केली आहे. रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक – शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांच्या पत्नींसह हाय-प्रोफाइल लोकांच्या कथित 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित हे प्रकरण आहे.

चंद्रशेखरने सिंग बंधूंच्या पत्नींची फसवणूक केली आणि जॅकलीन फर्नांडिससाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी या ‘गुन्ह्याचे पैसे’ किंवा अवैध पैसे वापरल्याचा आरोप ईडीने केला आहे.

2022 मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात, तपास यंत्रणेने असा दावा केला आहे की ‘अभिनेत्रीला गुन्हेगारी पूर्ववृत्तांबद्दल माहिती असूनही ती चंद्रशेखरने दिलेल्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि महागड्या भेटवस्तूंचा आनंद घेत होती’.

चंद्रशेखरच्या कथित गुन्हेगारी कारवायांची आपल्याला माहिती नव्हती आणि आपण निर्दोष असल्याचे जॅकलिन फर्नांडिसने म्हटले आहे.