
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आयफा सोहळा रंगला, पण हा सोहळा खऱ्या अर्थाने गाजला तो शाहीद कपूर आणि करीना या दोघांच्या भेटीने. इतर अनेक सेलिब्रिटी सुद्धा या सोहळ्यामध्ये उपस्थित होते. परंतु करीना आणि शाहिद समोर सर्वच फीके पडले होते. चर्चा केवळ करीना आणि शाहीदचीच रंगली आणि अजूनही रंगतेय.
आयफा अवॉर्ड्समध्ये दोघांनी एकमेकांना स्टेजवर पाहताच, मिठी मारली. पण या मिठीची चर्चा सोशल माध्यमांवर चांगलीच रंगली. हे दोघे एकत्र एका फ्रेममध्ये दिसल्यामुळे, प्रेक्षकांना दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट आठवला आणि सोशल मीडीयावर या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर आणण्याची मागणी सुरु झाली.
2007 मध्ये प्रदर्शित झालेला ‘जब वी मेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान सुपरहिट ठरला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट रोमँटिक चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानावर या चित्रपटाने आपला ठसा उमटवला. या चित्रपटाच्या माध्यमातून कलाकार म्हणून शाहिद आणि करीनाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहिद कपूर आणि करीना कपूर त्यांच्या आयुष्यातील एका कठीण टप्प्यातून जात होते. या चित्रपटापूर्वी दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण या चित्रपटादरम्यान शेवटच्या क्षणाला त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतरही दोघांनीही हा चित्रपट केला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. तसेच, हा चित्रपट नंतर संस्मरणीय चित्रपटांपैकी एक बनला.
शाहिद आणि करीनाच्या भेटीवर दिग्दर्शक इम्तियाज अली यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला हे खूप मनोरंजक वाटते की करीना- शाहीद आयफामध्ये भेटतात तेव्हा त्यांच्या केमिस्ट्रीची आणि ‘जब वी मेट’ चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. ‘जब वी मेट’ चित्रपट येऊन खूप दिवस झाले आहेत. दोघेही कलाकार आपापल्या वैयक्तिक आयुष्यातही पुढे गेले आहेत. जबरदस्तीने सिक्वेल बनवण्यापेक्षा, मला वाटतं आपण अशा आठवणी जपल्या पाहिजेत. मी दोघांसोबत सर्वोत्तम वेळ घालवला आहे. पण आता त्याचा सिक्वेल शक्य नाही’’.