‘जाट’मुळे सनी देओल, रणदीप हुड्डाच्या डोक्याला ताप; पंजाबमध्ये गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

अभिनेता सनी देओल, रणदीप हुड्डा आणि विनित कुमार सिंह यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जाट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तिकिटबारीवर चांगला गल्ला जमवत असल्याने सर्वत्र या चित्रपटाची चर्चा आहे. मात्र याच चित्रपटातील एका दृश्यामुळे चित्रपट निर्मात्यांसह कलाकार अडचणीत आले आहेत. पंजाबमध्ये ख्रिश्चन समाजाने निर्मात्यांसह कलाकारांविरुद्ध भावना दुखावल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे.

मंगळवारी जालंधर पोलिसांमध्ये विक्की गोलडी नावाच्या एका तरुणाने जाट चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा प्रभू येशूचा अनादर करताना दाखवण्यात आले आहे. यामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी चित्रपटाचे निर्माते, तसेच दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांच्यासह कलाकारांवर भादवि कलम 299 अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे.

काय आहे दृश्य?

10 एप्रिल रोजी ‘जाट’ हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. यातील एका दृश्यामध्ये तो चर्चेमध्ये क्रॉसच्याखाली उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावेळी चर्चमधील इतर लोक प्रार्थना करताना दाखवण्यात आले आहेत. हा प्रभू येशूचा अनादर असून यामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

गुड फ्रायडे आणि ईस्टरच्या पवित्र महिन्यात दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांनी जाणूनबुजून हा चित्रपट प्रदर्शित केला. यामुळे ख्रिश्चन समाजाची लोक संतप्त होऊन संपूर्ण देशात दंगली भडकतील आणि अशांतता पसरेल, असाही आरोप तक्रारदाराने केला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही तक्रारदाराने केली आहे.