180 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज व सर जे. जे. रुग्णालयाचा प्रेरणादायी इतिहास आता जनतेसाठी खुला झाला आहे. अठरा दशकांच्या कारकीर्दीत जे. जे. रुग्णालयात अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले. अनेक डॉक्टरांनी वैद्यकक्षेत्राला नवनव्या गोष्टी दिल्या. क्षयरोगाचा विषाणू रॉबर्ट कॉक्स या शास्त्रज्ञाने याच जे. जे. रुग्णालयात संशोधन करून शोधून काढल्याने आज लाखो क्षयरुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार होऊन ते बरे होत आहेत. जे. जे. रुग्णालयाचा हाच इतिहास सांगणाऱया म्युझियमचे आज उद्घाटन झाले.
जे. जे. रुग्णालयाच्या सेंट्रल पॅण्टीनजवळील बॉईज कॉमन रुममध्ये बनवलेल्या या म्युझियमचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते. 180 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल रुग्णालयात वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच हा भाग आहे. पहिल्या टप्प्यातील म्युझियम आजपासून सर्वांसाठी खुले करण्यात आले.
म्युझियममध्ये काय आहे
जे. जे. रुग्णालयाच्या प्रत्येक विभागात एक इतिहास दडला आहे. प्रत्येक विभागामध्ये दिवंगत शास्त्रज्ञ आणि निष्णात जगद्विख्यात डॉक्टरांचे पुतळे आहेत. प्रत्येकाने रुग्णालयाला आणि समाजाला काही ना काही दिले आहे. रुग्णालयात रोज हजारो लोक उपचारासाठी येतात, हजारो रुग्ण दाखल आहेत. कधी ना कधी हे पुतळे त्यांच्या नजरेला पडले असतील, पण ते कुणाचे आहेत आणि का ठेवले आहेत याबद्दल माहिती फक्त जुन्या डॉक्टरांनाच असेल. ती माहिती देण्याचा प्रयत्न रुग्णालयाने या म्युझियमच्या माध्यमातून केला आहे. ते सर्व पुतळे या म्युझियममध्ये ठेवण्यात येत आहेत.
भुयारही खुले करणार जे. जे. रुग्णालयाच्या जुन्या नर्सिंग इमारतीच्या खाली एक भुयार सापडले आहे. ते ब्रिटिशकालिन आहे. त्या भुयाराचीही डागडुजी करून त्याचा इतिहास पुरातत्व खात्याच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा रुग्णालय प्रशासनाचा प्रयत्न आहे.