गड-कोट – गडकिल्ल्यांचे शतक!

>> जे.डी. पराडकर

शिवरायांच्या शौर्याचं आणि हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या गडकिल्ल्यांबाबत प्रत्येक मराठी मनाला आस्था असते. हा अभिमान जपणारा तरुण अल्पेश सोलकर त्याने पाहिलेल्या 100 गडकिल्ल्यांचा इतिहास शाळा, कॉलेजमध्ये जाऊन कथन करीत महाराजांच्या ठेव्याचे वेगळ्या पद्धतीने जतन, संवर्धन करीत आहे.

छत्रपतींच्या काळातील गडकिल्ले म्हणजे वास्तुशास्त्राचा एक अद्वितीय आविष्कार म्हणून गणले जातात. शेकडो वर्षे या ऐतिहासिक वास्तू निसर्गाच्या रौद्रावताराला तोंड देत हिंदवी स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास आजही सर्वांसमोर उलगडून सांगत आहेत. हा ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी खरं तर प्रत्येकाची आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मलदेवाडी येथील अल्पेश कृष्णा सोलकर या तरुणाने आजवर शंभरपेक्षा अधिक गडांना भेटी देत तेथील माती आपल्या मस्तकी लावली आहे. प्रत्येक गडावरून त्याने शौर्याची एक विजयगाथा आपल्या धमन्यांत भरून घेतली आहे. हे सळसळते रक्त महाराष्ट्रातील अशाच सर्व गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी आणि साफसफाईसाठी कामी यावे यासाठी अल्पेशने संगमरत्न फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली आहे. गडकिल्ल्यांच्या सफाई मोहिमेसाठी झटणारी असंख्य रत्ने अल्पेशला येऊन मिळाली आणि त्यातूनच संगमरत्न उभे राहिले.

अल्पेश सोलकर त्याने पाहिलेल्या 100 गडकिल्ल्यांचा इतिहास शाळा, महाविद्यालयामध्येदेखील जाऊन सांगण्याचे महत्त्वाचे काम तो करत आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी, हिंदवी स्वराज्यातील या ऐतिहासिक वास्तूंचा खरा इतिहास त्यांना कळावा, भविष्यात अशा तरुणांनी गडकिल्ला साफसफाई मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा या उद्देशाने तो शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांजवळ संवाद साधण्याचे कार्यक्रमदेखील घेत असतो. त्याने प्रवास केलेल्या 100 गडकिल्ल्यांचे महत्त्व, त्याला आलेले अनुभव, या किल्ल्यावरील रक्तरंजित इतिहास या साऱयाचे वर्णन तो विद्यार्थ्यांसह तरुणासमोर देहभान विसरून सांगत असतो.

आपल्याला किल्ल्यांविषयी, तिथल्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती घेण्यात विशेष औत्सुक्य असते. गडकिल्ल्यांची ही उत्सुकता पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अल्पेशने वाटचाल सुरू केली. आतापर्यंत महाराष्ट्रातील एकूण किल्ल्यांपैकी शंभर गडकिल्ल्यांची भटकंती त्याने यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्वोच्च उंचीचे किल्ले आणि शिखरे यांचा समावेश आहे. सोबतच गडकिल्ले संवर्धनाचा ध्यासही नेहमीच त्याच्या उराशी असतो. आताच्या तरुण पिढीने गडकिल्ले संवर्धन करावे, निसर्गाच्या सान्निध्यात जावे तसेच इतिहास, भूगोल प्रत्यक्षात अनुभवावा हाच अल्पेशचा उद्देश आहे. गडकिल्ले भटकंती करताना आलेले चांगल्या, वाईट अनुभवांवरून त्याने आवश्यक वैद्यकीय प्रशिक्षणही पूर्ण केले. पुढील करीअर आपले याच क्षेत्राशी निगडित असावे म्हणून ‘संगमरत्न फाऊंडेशन’ या संस्थेची त्याने सुरुवात केली.

गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे भटकंतीसोबत ती अभ्यासलीदेखील पाहिजेत. म्हणून ऐतिहासिक घाटवाटा, स्थळे, समाधी स्थळे, मंदिरे, लेणी, किल्ले यांच्या अभ्यास मोहिमा घडविण्याचा ‘संगमरत्न फाऊंडेशन’चा मानस आहे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल तर सह्याद्रीत, रानावनात, गडकिल्ल्यांवर गेलेच पाहिजे याबाबतची जनजागृती करण्याचे काम संगमरत्नतर्फे केले जात आहे. गडकिल्ले शहरांजवळचे असू देत किंवा गावाजवळचे, शेवटी ते गडकिल्लेच आहेत. सध्याचे ट्रेकिंग मोठय़ा प्रमाणात ट्रेंडिंग स्थळे घेऊन केले जाते. त्यामुळे जिथे खरेच गेले पाहिजे, ती स्थळे दुर्लक्षित राहून जातात. सध्याची जीवनशैली बदलल्यामुळे मुलांमध्ये मैदानी खेळ किंवा भटकंतीत फारसा रस नसल्यासारखे दिसते; पण जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपल्याला शारीरिक क्षमतेचा कस कळून येतोच. सोबतच आपण त्या वातावरणाच्यादेखील प्रेमात पडतो. दुर्मीळ वस्ती, तेथील माणसे, त्यांचे राहणीमान, निसर्गाचादेखील अभ्यास होत असतो. हे सगळं अनुभवायचे असेल तर ट्रेकिंगशिवाय पर्याय नाही. गावाकडचेसुद्धा किल्ले नावारूपाला यावेत, तिकडे अधिक सोयीसुविधा व्हाव्यात यासाठी संगमरत्न प्रयत्न करत आहे.

[email protected]