
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व वॉर्डमध्ये आता 1 जानेवारीपासून ‘फेस रीडिंग’ हजेरी अनिवार्य करण्यात येणार आहे. यासाठी पालिका सुमारे दोन हजार मशीन्स घेणार असून त्या विभागनिहाय बसवल्या जाणार आहेत. ही पद्धत काही वॉर्डमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास सुरुवात झाली असून यशस्वीही झाली आहे. त्यामुळे आता सर्व ठिकाणी ही पद्धत वापरण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले.
पालिका कर्मचाऱयांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने लावण्यात येते. ही हजेरी कर्मचाऱयांच्या पगारालाही लिंक करण्यात आली आहे. मात्र मार्च 2020मध्ये मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर स्पर्श टाळून धोका कमी करण्यासाठी कर्मचाऱयांची हजेरी मस्टरवर सही करून लावली जात होती. तर कोरोना काळानंतर पुन्हा बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र काही वेळा बायोमेट्रिक मशीनमध्ये बिघाड होणे, हजेरी लावूनही हजेरी नोंदली न जाणे असे प्रकार घडत होते. हजेरी नीट नोंद होत नसल्यामुळे पगार कापल्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे कामगार संघटनांकडून अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आली होती. त्यामुळे हजेरीत सुसूत्रता आणण्यासाठी लिनक्स बेस्ड आधार व्हेरिफाईड फेसियलचा अवलंब करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभी 1 जानेवारीपासून ही याची अंमलबजावणी होणार असून कर्मचाऱयांना ती बंधनकारक असणार आहे. विभागनिहाय आतापर्यंत 1800 बायोमेट्रिक मशीन्स लावण्यात आल्या आहेत. यात आणखी 400पर्यंत मशीन लावल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
हजेरी पगाराशी लिंक राहणार
फेस रीडिंग हजेरी पद्धतीच्या वापरात कोणत्याही दिवसाच्या उपस्थितीसाठी प्रथम नोंद वेळ व अंतिम नोंद वेळ ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर ही हजेरी पगाराशीही लिंक राहणार आहे. त्यामुळे हजेरी नीट लागली नाही तर पगार कापला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपली हजेरी वेळेत उपस्थित राहून लावावी लागणार आहे. पालिकेत सध्या कार्यरत असणाऱया 93 हजार कर्मचाऱ्यांना ही हजेरी लावणे बंधनकारक राहणार आहे.