Pahalgam Attack – तो दहशतवादी हल्लाच होता! शब्दांचा खेळ करणाऱ्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला ट्रम्प सरकारनं फटकारलं

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध केला. मात्र अमेरिकेतील नामांकित वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तामुळे नवा वाद उफाळून आला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा उल्लेख अतिरेकी आणि बंदुकधारी असा केला आहे. यामुळे संताप व्यक्त होत असून आता ट्रम्प सरकारनेही याच मुद्द्यावरून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला फटकारले आहे.

पहलगाम हल्ल्याचे वृत्त देताना ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दहशतवादी या शब्दाऐवजी अतिरेकी (militants) आणि बंदुकधारी (gunmen) हे शब्द वापरले होते. याद्वारे घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केला, असा आरोप अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र विषयक समितीने केला. याबाबत या समितीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातमीचा मथळा सुधारला आणि त्यांचा निषेधही केला.

‘कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी 24 पर्यटकांना मारले!’, असा मथळा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिला होता. मात्र अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र विषयक समितीने ही चूक सुधारत अतिरेकी हा शब्द हटवून त्या जागी दहशतवादी हा शब्द वापरला.

‘न्यूयॉर्क टाइम्स’, तुम्ही दिलेल्या बातमीचा मथळा आम्ही दुरुस्त केला आहे. स्पष्टपणे सांगायचे तर हा दहशतवादी हल्लाच होता. हिंदुस्थान असो किंवा इस्रायल, दहशतवादाचा विषय येतो तेव्हा न्यूयॉर्क टाइम्स वास्तवापासून नेहमी दूर राहतो, असा आरोपही अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र विषयक समितीने केला.

ट्रम्प यांचा मोदींना फोन

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि शोक व्यक्त केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी अमेरिकेचा हिंदुस्थानला पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली होती.

Pahalgam Attack – पाकिस्तानचा ‘गेम’ अटळ! आधी ट्रम्प यांचा मोदींना फोन, आता US च्या परराष्ट्र विभागानंही भूमिका केली स्पष्ट