निवडणुका जाहीर झाल्यापासून संगमनेरचे राजकारण राज्याच्या केंद्रस्थानी आले. विखे आणि थोरात यांच्यातील संघर्ष जगजाहीर आहे. यात सुजय विखे हे संगमनेर विधानसभेला उभे राहणार अशा चर्चा होत्या. मात्र, आज या सर्व चर्चा फोल ठरवत भाजप आणि विखे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते अमोल खताळ यांना मिंधे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे येथे थोरात विरुद्ध विखे सामना होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
सुजय विखे यांनी आपण निवडणुकीला तयार आहोत, असे सांगितले होते. डॉ. विखे यांनी संगमनेरमध्ये सभांचा धडाका लावला होता. या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून संगमनेरमध्ये सुजय विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात अशी लढत पाहायला मिळते का काय, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आज मिंधे गटाकडून अमोल धोंडिबा खताळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.