
आग्य्रात बायकोच्या छळाला कंटाळून आयटी कंपनीत मॅनेजर असलेल्या मानव शर्माने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मानव शर्माने एक व्हिडीओ जारी करून बायकोच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. पुरुषांबद्दल विचार करा, असे तो व्हिडीओत बोलत आहे. त्यामुळे देशातील कायदे हे महिलांच्या बाजूने असल्यामुळे माझ्या भावाने आत्महत्या केलीय, असे विधान मानव शर्माच्या बहिणीने केले आहे.
आकांक्षा शर्माने म्हटले की, मानवचे लग्न मोडल्यापासून तो तणावात होता. तसेच घटस्फोटाच्या प्रक्रियेत अनेक कायदेशीर अडचणी असल्याच्या दबावातून त्याने आत्महत्या केली. मानवला निकिताच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर दोघांनी संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला, पण घटस्फोट इतक्या सहजासहजी मिळणार नाही याची त्याला कल्पना होती. घटस्फोटात येणाऱ्या संकटाला कंटाळून त्याने जीवन संपविले. सर्व कायदे महिलांच्या बाजूने आहेत, असे आकांक्षा यांनी म्हटले.
आधीही आत्महत्येचा प्रयत्न
प्रिया नावाच्या एका महिलेने त्यांना सांगितले की, निकिता आणि तिच्या दोन बहिणी विवाहित पुरुषांना हेरून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. हे कळल्यानंतर मानवने जानेवारी महिन्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण आई-वडिलांनी मुंबईला वेळीच धाव घेऊन त्याला रोखले होते. तसेच मानव आणि निकिता यांची समजूत काढून त्यांना एकोप्याने राहण्याची विनंती केली होती, असेही आकांक्षाने म्हटले आहे. मानवने निकितापासून वेगळे राहण्यास सुरुवात केली होती, पण निकिता कायद्याची भीती दाखवून त्याला धमकावत होती.
पत्नीने आरोप फेटाळले
मानव शर्मा हा मोठय़ा प्रमाणात मद्यपान करत असायचा. यापूर्वी त्याने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्याला तीन वेळा वाचवले. मद्यपान केल्यानंतर तो मला मारहाण करायचा. याबद्दल मी सासरच्या लोकांना अनेकदा सांगितले होते, परंतु त्यांनी माझ्या सांगण्याकडे सपशेल दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप करत मानव शर्माच्या पत्नीने सर्व आरोप फेटाळून लावले. मानव शर्माने माझ्यामुळे आत्महत्या केली नाही, असा दावाही तिने केला आहे.