आयटी कंपनीची मालकीण कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली. दोघांनी लग्नही केले. पण लग्नानंतर कोट्यवधींचा गंडा घालून पती फरार झाला. यामुळे व्यथित झालेली पत्नी पोलीस स्थानकात तक्रार देते, पण कोणतीही कारवाई न झाल्याने पोलीस स्थानकातच आत्महत्येचा प्रयत्न करते. एकदम फिल्मी वाटणारा हा प्रकार ओडिशामध्ये घडला आहे.
पीडित महिला अहमदाबादमधील आयटी कंपनीची मालकीण आहे. तिच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या मनोज नायक नावाच्या एका कर्मचाऱ्याच्या ती प्रेमात पडते. दोघे संमतीने लग्न करतात. दोघांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.
लग्नानंतर मनोज आपल्या गावी नरसिंहपूर येथे व्यवसाय सुरू करण्यासाठी पत्नीला राजी करतो. या व्यवस्यासाठी महिला आपली संपत्ती आणि कंपनीला गहाण ठेवते आणि पतीला कर्ज काढून 5 कोटी रुपये देते. मात्र 5 कोटी मिळताच मनोज तिला सोडून फरार होतो.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिला पोलिसात तक्रार दाखल करते. मात्र तीन महिन्यानंतरही त्याचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरतात. तक्रारीनंतरही कोणतीच कारवाई होत नसल्याने पीडित महिलेने बोनठ पोलीस स्थानकात फिनेल पिऊन आत्महत्या केली. यामुळे एकच गोंधळ उडाला. सदर प्रकार लक्षात येताच पोलीस स्थानकातील कर्मचारी तिला भद्रक जिल्हा रुग्णालयात दाखल करतात. तिची तब्येत सध्या स्थिर आहे.
याबाबत महिलेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, माझी बहीण गेल्या तीन महिन्यांपासून त्रस्त आहे. पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने ती व्यथित झाली असून यामुळेच तिने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले.
दरम्यान, बोनठ पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक श्रीवल्लभ साहू यांनी सांगितले की, आरोपीचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक बनवण्यात आले आहे. यात दोन इन्स्फेक्टर आणि दोन सब इन्स्फेक्टरचा समावेश आहे. या पथकाने ओडिशातील राउरकेला, संबलपूर आणि बेरहामपूर येथील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. पण अद्याप महिलेच्या पतीचा शोध लागलेला नाही.