लवकरच अंतराळातून स्मार्ट फोनचा वापर करून थेट कॉल करता येणार आहे. यामध्ये हिंदुस्थानची अंतराळ संस्था ‘इस्रो’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. इस्रो या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये अमेरिकन कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही स्मार्टफोनद्वारे थेट अंतराळातून कॉल केले जाऊ शकतात. जागतिक स्पेस इंडस्ट्रीत हिंदुस्थानच्या कामगिरीतील हा एक मैलाचा दगड ठरेल.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये उपग्रह लाँच केला जाईल. त्याद्वारे थेट अंतराळातून मोबाईल कॉल करता येईल. टेलिकम्युनिकेशमधील हे प्रगत तंत्रज्ञान आहे. हा उपग्रह कोणती कंपनी बनवत आहे, याची माहिती इस्त्रोने अद्याप दिलेली नाही. मात्र तज्ञांच्या मते, एटीएस स्पेस मोबाईल ही अमेरिकन कंपनी ऑपरेटर असेल. उपग्रहाच्या माध्यमातून कम्युनिकेशन करण्याची एटीएस स्पेस मोबाईल कंपनीची खासियत आहे.
अमेरिकन कंपनी हिंदुस्थानातून एवढा मोठा दळणवळण उपग्रह प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हिंदुस्थानने आतापर्यंत फक्त अमेरिकन कंपन्यांचे छोटे उपग्रह सोडले आहेत. या उपग्रहाचे वजन सुमारे 6 हजार किलोग्रॅम असेल. हे पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये स्थापित केले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉन्च व्हेईकल मार्क-3 हे लॉन्च करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
ब्लूबर्डचा उपग्रह झेपावणार
ब्लूबर्ड उपग्रह हे सेल्युलर ब्रॉडबँड (मोबाइल फोन नेटवर्क) अंतराळापासून स्मार्टफोनपर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेल्या उपग्रहांचा ग्रुप आहे. हा कंपनीच्या स्पेसमोबाइल कम्युनिकेशन सिस्टमचा एक भाग आहे. ब्लूबर्ड उपग्रहामध्ये 64 चौरस मीटरचा अँटेना असेल, जो अर्ध्या फुटबॉल मैदानाएवढा असेल.