इस्रोने अंतराळात चार दिवसांत उगवली चवळी

इस्रोने 30 डिसेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून स्पाडेक्स म्हणजेच  अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम सुरू केली. याअंतर्गत पृथ्वीपासून 470 किमीवर अंतराळ यान तैनात करण्यात आले. पीएसएलव्ही पीओईएम-4 सोबत या मोहिमेसाठी विक्रम साराभाई स्पेस सेंटरने तयार केलेले क्रॉप्स (कॉम्पॅक्ट रिसर्च मॉडय़ूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज) पाठवण्यात आले आहे. या क्रॉप्सने चवळीच्या बिया अवघ्या चार दिवसांत अंकुरित केल्या. लवकरत त्यांना पाने येतील. इस्रोने त्याचा फोटो शेअर केला.

अंतराळात जीवन अंकुरित करण्याच्या प्रयोगासाठी चवळीचे बियाणे निवडले गेले. चवळी ही पौष्टिक मूल्य असलेली वनस्पती आहे. हा प्रयोग अंतराळात अन्न वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.

पालक भाजीचे संशोधन

संशोधन आणि विकासाशी संबंधित 24 पेलोडदेखील स्पाडेक्ससोबत पाठवण्यात आले. हे पेलोड पृथ्वीपासून 700 किमी उंचीवर डॉक केलेले आहेत. यापैकी 14 पेलोड्स इस्रोचे आहेत. यामध्ये ऍमिटी प्लान्ट एक्सपेरिमेंटल मॉडय़ूल इन स्पेसचा पेलोड आहे. ते अवकाशात वनस्पतींच्या पेशी वृद्धीवर संशोधन करेल. पालकाच्या पेशींना सूर्यप्रकाश आणि पोषक तत्त्वे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी एलईडी लाईट्स आणि जेलच्या माध्यमातून पुरवल्या जातील.