इस्रोने 29 जानेवारी रोजी एनव्हीएस-02 उपग्रह लाँच केला होता. इस्रोची ही 100 वी अंतराळ मोहीम आहे. या ऐतिहासिक मोहिमेत आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे उपग्रह त्याच्या निर्धारित कक्षेत जाऊ शकलेला नाही. इस्रोने याबाबत माहिती देताना सांगितले की, उपग्रहात तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. एक वॉल्व नादुरुस्त झाल्याने ही वेळ आली आहे. अपोजी मोटर म्हणजेच लॅमला सुरू करण्यासाठी हा वॉल्व ऑक्सिडायझरचा पुरवठा करतो. आता ऑक्सिडायझरच मोटरला मिळू शकणार नसल्याने लॅमही सुरू होणार नाही. रविवारपर्यंत उपग्रह जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्येच अडकलेला होता. या कक्षेचा वापर उपग्रहाला त्याच्या अंतिम कक्षेत पोहोचविण्यासाठी केला जातो. हा नेव्हिगेशन सॅटेलाईट आहे. त्याला काम करण्यासाठी गोल कक्षेची गरज असते. एलएएम प्रज्वलित झाल्याशिवाय हे शक्य नाहीय. उपग्रह पुढे सरकत नसल्याचे पाहून चार दिकसांपासून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या बैठकाकर बैठका सुरू आहेत. परंतु, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. उपग्रह ज्या कक्षेत अडकला आहे. त्याच ठिकाणी ऑक्टिक करणे हा सर्वात मोठा प्रश्न इस्रो पुढे आहे.
- लाँच झाल्यानंतरच तांत्रिक अडचणीची बाब इस्रोच्या लक्षात आली होती. सध्या उपग्रह सिस्टीम सुस्थितीत असून लंबगोलाकार कक्षेत आहे.
- इस्रोमध्ये सध्या या विषयावर एकामागोमाग एक बैठकांचे सत्र सुरू आहे. यात नेव्हिगेशनसाठी उपग्रहाचा वापर करण्याच्या पर्यायी मोहिमेच्या रणनीतीवर आता काम केले जात आहे.
- अंतराळयानाची सर्व प्रणाली योग्य प्रकारे काम करत आहे. उपग्रह नियंत्रित करण्यासही यंत्रणा कार्यक्षम आहे, परंतु आता ज्या कक्षेत हा उपग्रह अडकला आहे, तिथेच तो कार्यान्वित करायचा का, असा प्रश्न इस्रोसमोर आहे.
- या मिशनचे भवितक्य सध्या तरी अंधातरी दिसत असून यावर तोडगा निघेल की, नाही हे लवकरच कळेल.