गाझातील रुग्णालय इस्रायली सैन्याने पेटवले

इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षामुळे संपूर्ण गाझा पट्टी उद्ध्वस्त झाली आहे. जिकडेतिकडे मृत्यूचे तांडव, इमारतींचे ढिगारे आणि रोगराई असे चित्र आहे. येथे सुरू असलेल्या एकमेव आणि शेवटच्या रुग्णालयाच्या अनेक विभागांना इस्रायली सैन्याने आज पुन्हा आग लावली. रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर आणि रुग्णांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले तसेच वैद्यकीय सुविधा उद्ध्वस्त करण्यात आल्या, असा दावा गाझातील आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

गाझा पट्टीतील कमल अदवान रुग्णालयावर गेल्या तीन महिन्यांत इस्रायली सैन्याकडून अनेकदा हल्ले झाले आहेत. रुग्णालयाच्या आजूबाजूला तसेच बंकरमध्ये हमासचे दहशतवादी लपल्याचा दावा करत इस्रायलकडून कारवाई करण्यात आली. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात अलीकडेच पाच वैद्यकीय कर्मचाऱयांचा मृत्यू झाल्याचा दावाही गाझातील आरोग्य मंत्रालयाने केला आहे. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱयांनी मात्र येथे हमासचे दहशतवादी लपल्याच्या दाव्याचा साफ इन्कार केला आहे. इस्रायलकडून कुठल्याही पुराव्याअभावी कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पाच पॅलेस्टिनी पत्रकारांचा मृत्यू

इस्रायली सैन्याने गाझापट्टीत गुरुवारी रात्री उशिरा केलेल्या हवाई हल्ल्यात पाच पॅलेस्टिनी पत्रकारांचा मृत्यू झाला. अल अवदा रुग्णालयाबाहेर उभारण्यात आलेल्या निर्वासितांच्या शिबिराजवळ हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात या पत्रकारांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.