नेतन्याहू यांच्या घरावर हल्ल्यानंतर इस्रायलचा गाझात हवाई हल्ला, पंतप्रधानांच्या घरावर डागले होते फायर गोळे

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सीझेरिया येथील घरावर पुन्हा हल्ला झाला. त्यानंतर इस्रायली सैन्याने गाझापट्टीत हवाई हल्ला केला. यात 12 जणांचा मृत्यू झाल्याचे पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या घरावर हल्ला करणाऱया तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्याच्या वेळी नेतन्याहू आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते असे सुरक्षा एजन्सीने म्हटले आहे. याआधी 19 ऑक्टोबर रोजी नेतन्याहू यांच्या घरावर हिजबुल्लाहने हल्ला केला होता. नेतन्याहू यांच्या घराजवळील इमारतीवर ड्रोन डागण्यात आले होते. त्यावेळीही नेतन्याहू आणि त्यांची पत्नी घरी नव्हते.

नेतन्याहू यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. विरोधी पक्षनेते यायर लॅपिड आणि बेनी गँट्झ यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शत्रूने सर्व मर्यादा ओलांडल्या असून सुरक्षा यंत्रणा चोख प्रत्युत्तरासाठी सज्ज असल्याचे इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्स यांनी सोशल हल्ल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते. इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्येही हवाई हल्ले केले. या हल्ल्यांआधी येथील अनेक इमारती रिकाम्या करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी बैरूत येथील दक्षिणेकडे इस्रायलची लढाऊ विमाने घिरटय़ा घालत होती. दहीयेह या भागात हिजबुल्लाहचे दहशतवादी लपल्याचा संशय आहे त्यामुळे इस्रायलने या भागात हवाई हल्ल्यांना सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर लेबनीज अधिकाऱयांनी अमेरिकेपुढे युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आहे.