
इस्रायली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी बात याम (Bat Yam) शहरामध्ये तीन बस मध्ये बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान या स्फोटांनंतर शहरातील बस सेवा बंद करण्यात आल्याअसून बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू असल्याचे कळते आहे.
संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी ‘पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेचा’ या स्फोटामागे हात असल्याचे आरोप केले आहेत. दरम्यान, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तात्काळ सुरक्षा बैठक बोलवली आहे.
प्राथमिक अहवालानुसार ही घटना म्हणजे संशयित दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितलं जात आहे. बात याममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक बसेसमध्ये स्फोट झाल्याचे अनेक वृत्त येत असल्याचे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.
तीन बसमध्ये स्फोट झाला तर दोन बॉम्ब निकामी करण्यात आल्याचेही पोलिसांनी एएफपीला सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे.
संशयितांचा शोध घेण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले असून बॉम्ब निकामी करणारे युनिट्स अतिरिक्त संशयास्पद वस्तूंचे स्कॅनिंग करत आहेत. जनतेला कारणाशिवाय बाहेर पडण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद वस्तूंपासून सतर्क राहण्याचे आवाहन देखील निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
बात यामचे महापौर त्झविका ब्रोट यांनी एका व्हिडीओ निवेदनात म्हटले आहे की, ‘या घटनांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही’.
काही इस्रायली नेटवर्क्सनी प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये एक बस पूर्णपणे जळालेली दिसत असून दुसऱ्या बसमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत आहेत.