
हमासने इस्त्रायली ओलिसांना सोडल्यानंतर इस्त्रायलने शनिवारी पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले, परंतु इस्त्रायलने पॅलेस्टिनींसाठी खास संदेशही पाठवला. विसरणारही नाही आणि माफही करणार नाही असे लिहिलेले टी-शर्ट घालून 369 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यात आले.
हमासने प्रत्येक वेळी तीन इस्त्रायली ओलिसांना सोडताना एका कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात ओलिसांना आणले जाते. यावेळी पॅलेस्टिनी नागरिकांसमोर ओलिसांना हमासची स्तुती करण्यास भाग पाडले जाते. या कार्यक्रमात हजारो पॅलेस्टिनी लोक उपस्थित असतात. हमासच्या या कृतीवर इस्त्रायल प्रचंड नाराज आहे. त्यामुळेच इस्रायलने पॅलेस्टिनींना सोडताना हमाससाठी खास संदेश पोहोचवण्याची तयारी केली आहे.
आजही हमासने तीन इस्रायली ओलिसांना सोडताना एका इव्हेंटचे आयोजन केले. युद्धविराम करारांतर्गत इस्त्रायली प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी 10 वाजता तीन ओलिसांना गाझाच्या खान युनिस परिसरात आणले गेले आणि रेड क्रॉसच्या हवाली करण्यात आले. सोडण्यात आलेल्या ओलिसांमध्ये तीन पुरुष बंधक असून नाम सागुई डेकेल-चेन, साशा ट्रोफानोव आणि इएयर हॉर्न यांचा समावेश आहे.
498 दिवसांनंतर परतले तीन ओलीस
गेल्या महिन्यात लागू झालेल्या युद्धविराम करारांतर्गत ओलीस आणि पॅलेस्टिनी कैद्यांची अदला-बदली करण्याची सहावी वेळ होती. यावेळी सोडलेले इस्रायली ओलिसांची प्रकृती गेल्या आठवड्यात सोडलेल्या ओलिसांच्या प्रकृतीपेक्षा अधिक चांगली आहे. गेल्या आठवड्यात सोडलेले तीन ओलीस अतिशय हडकुळे झालेले दिसत होते. यावरून इस्त्रायलने हमासवर प्रचंड टीकाही केली होती.
हमासने आतापर्यंत इस्रायलचे 19 आणि थायलंडच्या पाच ओलिसांना सोडले आहे. यावेळी सोडलेल्या ओलिसांची तब्बल 498 दिवसांनंतर सुटका झाल्याचे इस्त्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले. या तिघांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर इस्त्रायली डिफेन्स फोर्सच्या कॅम्पमध्ये नेण्यात येईल. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटू दिले जाणार आहे.