इस्रायलचे गाझावर रात्रभर हल्ले; 50 हून अधिक पॅलेस्टिनी ठार

इस्रायलने गाझा पट्टीत रात्रभर केलेल्या हल्ल्यात 50 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. लवकरच इस्रायल गाझामधील मोठय़ा भागावर कब्जा करेल आणि या भागात नवीन सुरक्षा कॉरिडॉर स्थापन करेल, असे तेथील वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. हमासचा फडशा पाडण्यासाठी इस्रायलचे हल्ले सुरूच असून यामुळे निष्पाप पॅलेस्टिनी मारले जात आहेत. त्यात अन्न, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची आयात इस्रायलने महिनाभर थांबवली आहे.

इस्रायलने विविध वस्तूंचा पुरवठा थांबवल्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागला आहे. ताज्या हल्ल्याच्या एक दिवस आधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासवर दबाव आणण्यासाठी गाझा पट्टी ओलांडून एक नवीन सुरक्षा कॉरिडॉर स्थापन करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच, हमासने गाझामधील सत्ता सोडण्याचे आवाहन इस्रायलने केले. काही दिवसांपासून गाझा पट्टीत हमासला स्थानिक पॅलेस्टिनी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.