इस्रायलने लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्लाविरुद्धचे हल्ले आणखी तीव्र केले आहेत. इस्रायलने हिजबुल्लाच्या मुख्यालयावर हवाई हल्ला करताना तब्बल 80 टन वजनाचा बॉम्ब डागला. यात हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्लाचा खात्मा केला. या हल्ल्यानंतर लेबनॉनसह इराणमध्ये खळबळ उडाली आहे. मध्य-पूर्वमध्ये युद्धाचा भडका आणखी भडकण्याची भीती आहे.
गेल्या आठवडय़ापासून इस्रायलकडून लेबनॉनवर हवाई हल्ले सुरू आहेत. यात एक हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला असून, हजारो नागरिक बेघर झाले आहेत. हिजबुल्लाचा बीमोड करण्यासाठी हल्ले सुरूच ठेवणार, असा इशारा इस्रायलने दिला आहे.
एक बॉम्ब हल्ला…. सहा इमारती जमीनदोस्त
हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्ला हा बैरूतमध्ये आपल्या मुख्यालयात लपून बसला होता. इस्रायलच्या हवाई दलाने नसरल्ला याला टार्गेट करताना मुख्यालयावर तब्बल 80 टन वजनाचा शक्तिशाली बॉम्बहल्ला केला. हा हल्ला एवढा भीषण होता की आजूबाजूच्या सहा इमारतीही जमीनदोस्त झाल्या. नसरल्ला ठार झाल्याचे इस्रायलच्या ‘आयडीएफ’ने पहिल्यांदा जाहीर केले. आता जगाला नसरल्लाला घाबरण्याची गरज नाही. तो दहशत पसरवू शकणार नाही असे ‘आयडीएफ’ने म्हटले आहे.
नेतन्याहू यांनी अमेरिकेतून दिले हल्ल्याचे आदेश
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे शुक्रवारी अमेरिकेत होते. संयुक्त राष्ट्र संघात भाषण दिल्यानंतर हिजबुल्लाच्या मुख्यालयावर हल्ला करण्याचे आदेश त्यांनी दिले. लँडलाईन पह्नवरून नेतन्याहू हल्ल्याचे आदेश देतानाचे छायाचित्र इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे.