
हमासने इस्रायलच्या अटीशर्ती मानण्यास नकार दिल्याचे कारण देत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझापट्टीवर पुन्हा हल्ला चढवला यात 400 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. मात्र, ही फक्त सुरुवात आहे. हमासला मुळापासून नष्ट करत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा नेतन्याहू यांनी दिला आहे. इस्रायलने पुन्हा गाझापट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचे सरकार चालवणारे पंतप्रधान इमाम दिव अब्दुल्ला अल दलिस यांची हत्या केली असून तीन दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला आहे.
इस्रायलने हमासच्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी जमिनीवरील मोहीम आखली आहे. या नव्या मोहिमेनुसार इस्रायल 2 दशलक्ष पॅलेस्टिनींना देण्यात येणारे अन्न, औषधे, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद करणार आहे.
400 निष्पाप नागरिकांची हत्या –प्रियंका गांधी
इस्रायलने 130 मुलांसह तब्बल 400 निष्पाप नागरिकांची थंड डोक्याने हत्या केली. त्यांच्या लेखी मानवतेचे काहीच मूल्य नाही, अशा शब्दांत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी इस्रायलच्या हल्ल्याप्रकरणी एक्सवरून तीव्र संताप व्यक्त केला. पॅलेस्टिनी नागरिकांनी प्रचंड भोगले आहे. परंतु, त्यांच्यात अजूनही संघर्ष करण्याची भावना कायम आहे, असे म्हणत प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टिनी नागरिकांची प्रशंसा केली.