इस्रायल आणि हमास यांनी गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी आणि पॅलेस्टिनी कैदी आणि इस्रायली बंधक सोडवण्यासाठीचा एक महत्त्वाचा करार केला आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांनी आयोजित केलेल्या महिनाभराच्या मोठ्या वाटाघाटींनंतर हे यश आले आहे. 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या आधी झालेला हा करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
इस्रायल आणि हमासमधील संघर्ष विनाशकारी आहे, हमासच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी सुरक्षा नियम तोडल्यानंतर इस्रायली सैन्याने गाझावर हल्ला केला. दोन्ही बाजूंचा विचार केल्यास 1200 सैनिक मारले गेले आणि 250 हून अधिकांना बंधक बनवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार 46 हजार नागरिक मारले गेले आणि लाखो विस्थापित झाले आहेत. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते शिबिरांमध्ये रहात आहेत.
मध्य पूर्वेला उद्ध्वस्त करणाऱ्या 15 महिन्यांच्या युद्धाच्या समाप्तीच्या दिशेने हा करार एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिला जातो. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बंधकांना सोडले नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा दिला होता. तर अमेरिकेचे मध्य पूर्वेतील राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी करार सहज करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या टीमसोबत जवळून काम केले.
बंधकांना सोडण्यात येणार असल्यानं पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारविरुद्धचा जनतेचा राग कमी होण्याची अपेक्षा आहे. 7 ऑक्टोबर हा इस्रायलच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक दिवस ठरला. यावेळी नेतन्याहू सरकारवर टीका झाली. या संघर्षाचे दूरगामी परिणाम देखील झाले आहेत, लेबनॉन, इराक आणि येमेनमधील इराण समर्थकांनी पॅलेस्टिनींशी ऐक्य दाखवत इस्रायलवर हल्ला केला आहे.
हा प्रदेश कराराच्या अंमलबजावणीची वाट पाहत आहे. अशातच या निर्णयामुळे कायमस्वरूपी शांततेचा मार्ग मोकळा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.