अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्त्रायल-हमास युद्धबंदी करारावर सहमती झाल्याचे सांगितले असले तरी हल्ले अद्याप सुरू असल्याची माहिती आहे. ’युद्धविरामाची घोषणा केल्यापासून इस्त्रायलच्या हल्ल्यात किमान 72 लोक ठार झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 72 मृतांमध्ये केवळ गाझा शहरातील दोन इस्पितळांमधील मृतदेहांचा समावेश आहे. कालच्या दिवसाप्रमाणे आजचाही दिवस रक्तरंजित होता’, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. तब्बल 15 महिन्यानंतर इस्त्रायल-हमास युद्धबंदी करारावर सहमती झाल्याचे बुधवारी जो बायडेन यांनी जाहीर केले. मात्र, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धबंदी कराराला अद्याप सहमती दर्शवली नसल्याचे वृत्त आहे. नेतन्याहू यांनी करारात काही त्रुटी असल्याचे संकेत देण्यास सुरुवात केली आहे.