इस्रायलचा दक्षिण गाझापट्टीवर हल्ला; 71 ठार, 289 जखमी

इस्रायलचे गाझावरील हल्ले सुरूच आहे. इस्रायलने दक्षिण गाझापट्टीवर खान युनिस परिसरात शनिवारी केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 71 नागरिक ठार झाले असून 289 जण जखमी झाले आहेत,  अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. जखमींवर सध्या नजीकच्या नासेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हमास संचलित गाझा सरकारने या हल्ल्याला मोठा नरसंहार असे म्हटले आहे.

दक्षिण इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि इस्रायल-हमास युद्धाची सुरुवात करणारा मोहम्मद देईफ हा अनेक वर्षांपासून इस्रायलच्या मोस्ट वॉण्टेड यादीत होता. त्यातच शनिवारी इस्रायलकडून गाझावर हल्ला करण्यात आला आहे. इस्रायली सैन्याने या हल्ल्याबद्दल जारी केलेल्या निवेदनात म्हटलेय, जिथे दोन वरिष्ठ हमास कमांडर लपले होते तिथेच हा हल्ला केला आहे. हवाई हल्ल्याचे ठिकाण झाडे, अनेक इमारती आणि शेड यांनी वेढलेले एक खुले क्षेत्र होते.  तर इस्रायली लढाऊ विमाने, तोफखाना आणि ड्रोनने विस्थापित लोकांना लक्ष्य केले असून या हल्ल्यात अनेक निरापराधांचा बळी गेला आहे, असे हमासने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या हल्ल्यात मोहम्मद देईफ मारला गेला आहे की नाही हे स्पष्ट झाले नाही, असे इस्रायली आर्मी रेडिओने म्हटले आहे.

आतापर्यंत 38,300 जणांचा बळी 

हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ले केले. अनेक दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. यात 1200 जणांचा मृत्यू झाला, तर 250 लोकांचे अपहरण करण्यात आले होते. हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझावर जोरदार हल्ले सुरू केले. यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत 38,300 हून अधिक जण मारले गेले आहेत आणि 88 हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. गाझातील 80 टक्के लोकांनी राहते घर सोडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ते छावण्यांमध्ये गर्दी करून राहत आहेत.