
युद्धविरामाची चर्चा सुरू असताना मंगळवारी पहाटे इस्रायलने पुन्हा एकदा गाझामधील हमासच्या तळावर हवाई हल्ले सुरू केले. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान 413 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. 19 जानेवारीच्या इस्रायल-हमास युद्धबंदीनंतरचा गाझातील हा सर्वात मोठा हल्ला आहे. यामुळे युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता मावळली आहे.
युद्धबंदीच्या चर्चेत प्रगती होत नसल्याने हल्ल्याचे आदेश दिले तसेच अधिक ताकदीने हमासच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यांमुळे हमासच्या ताब्यात असलेल्या सुमारे दोन डझन इस्रायली ओलिसांच्या भवितव्याबद्दलही प्रश्न उपस्थित झाला आहे, मात्र ओलिसांना सोडले नाही तर गाझामध्ये नरकाचे दरवाजे उघडले जातील, असा इशारा इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिला.
ओलिसांसाठी मृत्युदंड
इस्रायलचा पुन्हा युद्धाला तोंड फोडण्याचा निर्णय म्हणजे उर्वरित ओलिसांसाठी मृत्युदंड असल्याचा इशारा हमासने दिला. दरम्यान, दक्षिणेतील रफाह शहरावर इस्रायलने हल्ला करून जनजीवन विस्कळीत केले. येथील घरावर झालेल्या हल्ल्यात एका कुटुंबातील 17 जण दगावले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. सात रुग्णालयांमधील नोंदीनुसार मंगळवारपर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये किमान 413 लोकांचा मृत्यू झाला.