इशानचे शानदार शतकोत्तर, दुलीप ट्रॉफीत हिंदुस्थान ‘क’ संघाची साडेतीन शतकी मजल

गतवर्षी रणजी स्पर्धेत न खेळल्यामुळे हिंदुस्थानी संघच नव्हे तर केंद्रीय करारातून वगळलेल्या धडाकेबाज फलंदाज आणि यष्टिरक्षक इशान किशनने आज हिंदुस्थान ‘क’ संघाकडून खेळताना शानदार शतक ठोकत आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले. दुलीप करंडकाच्या दुसऱ्या सामन्यात इशानच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थान ‘क’ ने हिंदुस्थान ‘ब’ संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 5 बाद 357 धावांची दमदार मजल मारत पहिल्या दिवसावर आपले राज्य गाजवले.

गेल्या आठवड्यात झालेल्या दुलीप ट्रॉफीच्या सलामीच्या फेरीत हिंदुस्थान ‘क’ संघात इशानची निवड करण्यात आली नव्हती. मात्र त्यानंतरही ‘क’ संघाने हिंदुस्थान ड संघाचा पराभव केला होता. हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी दुलीप ट्रॉफी अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेतील कामगिरीवर साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. त्यातच आज इशानच्या शतकाने निवड समितीला खडबडून जागे केलेय.

दबावाखाली इशान फलंदाजीला

अभिमन्यू ईश्वरनने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले आणि ‘क’ संघाचे ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन मैदानात उतरले खरे पण ऋतुराज 4 धावांवर असताना जखमी झाला आणि त्याने निवृत्ती पत्करली. पण त्यानंतर सुदर्शनसह रजत पाटीदार यांनी संघाला 96 धावांपर्यंत नेले. पाटीदार (40) बाद होताच पाठोपाठ सुदर्शनही (43) बाद झाला. 4 चेंडूंत 2 विकेट गमावल्यामुळे हिंदुस्थान ‘क’ अडचणीत आला होता. तेव्हा इशान किशनचे आगमन झाले आणि त्याने क्षणार्धात संघाचा डाव आपल्या हातात घेत बाबा इंद्रजीतसह तुफान फटकेबाजीला सुरूवात केली. दोघांनी 189 धावांची खणखणीत भागी रचत संघाला 65 षटकांतच त्रिशतकासमीप नेले.

इशानने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देताना 124 चेंडूंत 111 धावांची खेळी साकारली. यात 14 चौकारांसह 3 षटकारांचाही समावेश होता. त्याच या खेळीने भलेभले हादरले आहेत. तो बाद झाल्यावर बाबाची खेळीही 78 धावांवर संपली. दोन धक्के बसल्यामुळे डावाच्या सुरुवातीलाच जखमी निवृत्त झालेला कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा मैदानात परतला. दिवसाचा खेळ संपण्याच्या मार्गावर असताना अभिषेक पोरेल बाद झाला, पण त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे 79 व्या षटकातच खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा हिंदुस्थान ‘क’ संघाने 4.51 धावांच्या सरासरीने 357 धावा चोपल्या होत्या. ‘ब’ संघाकडून मुकेश कुमारने 76 धावांत 3 विकेट टिपल्या.

मुलानी आला धावून

हिंदुस्थान ‘ड’ संघाच्या भन्नाट गोलंदाजीसमोर आघाडीच्या साऱ्याच फलंदाजांना अपयश आल्यामुळे 93 धावांतच त्यांचा अर्धा संघ गारद झाला होता. अशा बिकट अवस्थेतून मुंबईकर शम्स मुलानीने हिंदुस्थान ‘अ’ संघाला बाहेर काढले. आधी त्याने कुमार कुशाग्रसह 51 धावांची भागी रचली आणि मग मुंबईकर तनुष कोटियनच्या साथीने 91 धावांची भागी रचून संघाला 235 धावांपर्यंत नेले. दोन्ही मुंबईकरांनी अर्धशतके खेळी केल्यामुळे हिंदुस्थान ‘अ’ चा डाव सावरला गेला. मुलानीने शतकाच्या दिशेने झेप घेत 8 बाद 288 धावांपर्यंत नेले आणि स्वतःही 88 धावांवर नाबाद राहिला. त्याने 174 चेंडूंतही ही संयमी खेळी केली.

इशानच्या खेळीने सारेच अडचणीत

गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्याची शिक्षा भोगल्यानंतर आज अचानक मैदानात परतलेल्या इशानने साऱ्यांनाच थक्क करून सोडले. जो दुलीपमध्ये खेळेल त्याला हिंदुस्थानी संघात स्थान मिळणार, हे निश्चित आहे. त्यामुळे इशानच्या या सणसणीत खेळीमुळे निवड समिती अडचणीत सापडली आहे. आधीच पहिल्या कसोटीसाठी ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल या दोन मुळ यष्टिरक्षकांना संघात स्थान दिले आहे. त्यातच इशान हासुद्धा यष्टिरक्षक आहे. एवढेच नव्हे तर दुसरीकडे के. एल. राहुलसुद्धा संघात घुसण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी हिंदुस्थानी संघात कुणाची वर्णी लावावी आणि कुणाला बाहेर बसवावे, हा प्रश्न निवड समितीसमोर उभा ठाकला आहे. इशान किशनच्या या खेळाकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही.