इशान घालणार धुमशान, टीम इंडियात पुनरागमन करण्याचे ध्येय

आपल्या झंझावाती खेळाने अवघ्या हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या गळय़ातला ताईत बनलेला इशान किशनसारखा टॅलेंटेड फलंदाज आज आपल्या अपयशी कामगिरीसह गैरवर्तनामुळे संघाबाहेर फेकला गेलाय. काही दिवसांपूर्वी तो एकेका धावेसाठी झगडत होता. मात्र गेले काही महिने घेत असलेल्या मेहनतीनंतर यंदाच्या आयपीएलमध्ये इशानची फलंदाजी धुमशान घालणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनो, आगामी आयपीएलमध्ये इशानच्या षटकार-चौकारांची आतषबाजी पाहण्यासाठी तयार व्हा असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

2023 च्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा सोडून इशान मायदेशी काय परतला. त्याच्यावर बीसीसीआयने कठोर कारवाई केली. त्याला संघातूनच नव्हे, तर बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीतूनही वगळण्यात आले आणि इशानची कारकीर्दच संकटात सापडली. आज त्या घटनेला दीड वर्ष झाले तरीही इशान टीम इंडियाच्या आसपासही पोहोचलेला नाही. त्यात त्याची ओळख बनलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघातूनही त्याला मुक्त केल्यानंतर तो यंदा सनरायझर्स हैदराबादच्या संघात दाखल झाला आहे. गेल्या वेळी थोडक्यात जेतेपद हुकलेल्या हैदराबादला आता इशानच्या फलंदाजीचेही बळ लाभणार हे कुणीही नाकारू शकत नाही.

हैदराबादमध्ये दाखल झाल्यावर इशानने आंतरसंघ झालेल्या सामन्यात 23 चेंडूंत 64 धावांची घणाघाती खेळी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केलेय.

इशान नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता

गेली सहा वर्षे मुंबई इंडियन्ससाठी झंझावाती सलामी देणारा इशान किशन सनरायझर्स हैदराबादमध्ये वेगळय़ा भूमिकेत दिसू शकतो. कारण हैदराबादमध्ये अभिषेक शर्मा आणि ट्रव्हिस हेडसारखे वादळ सलामीला यशस्वीपणे घोंगावत असताना इशानला सलामीला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. तरीही तो पर्यायी सलामीच्या जोडीत फिट बसू शकतो. त्याची जोडी अभिषेक किंवा हेडशीसुद्धा केली जाऊ शकते. पण हे सध्या जर तर आहे. तसेच हेन्रीक क्लासनसारखा भन्नाट यष्टिरक्षक फलंदाजही असल्यामुळे इशानला ग्लोव्हज् काढून मधल्या फळीत किंवा फिनिशरच्या भूमिकेत खेळावे लागण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलचा दीर्घ कार्यक्रम इशानला कोणत्या भूमिकेत खेळताना पाहील याची आखणी खुद्द हैदराबादचे संघव्यवस्थापन सध्या करीत आहे. इशानचे टॅलेंट ते असेच वाया नक्कीच घालवणार नाहीत.

पहिलेच शतक द्विशतक

इशानने टी-20 क्रिकेटद्वारे हिंदुस्थानी संघात एण्ट्री केली, पण त्याने गाजवले एकदिवसीय क्रिकेट. 2021 मध्ये वन डे पदार्पण करताना त्याने 42 चेंडूंत 59 धावांची खेळी केली. त्याच वर्षी दहावा सामना खेळत असताना बांगलादेशविरुद्ध 131 चेंडूंत 24 चौकार आणि 10 षटकारांची तुफान फटकेबाजी करत त्याने 210 धावांची विक्रमी खेळी केली. हे त्याचे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक होते आणि पहिल्याच शतकाला द्विशतकी मुलामा देणारा तो पहिलाच आणि एकमेव फलंदाज आहे.