अखेर IRS सुधाकर शिंदे यांची मुळ ठिकाणी रवानगी

IRS अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे गेल्या आठ वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेत कार्यरत होते. ते आयएएस अधिकारी नसताना देखील महापालिकेत कार्यरत कसे असा सवाल विरोधकांनी उचलला होता. तसेच सुधाकर शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपल्याला हवी ती कामे करून घेतात अशी देखील टीका सुरू होती. अखेर आता सुधाकर शिंदे यांची मुळ ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तसे पत्र सहसचिवांकडून देण्यात आले आहे.

23 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांचा कार्यकाळ संपला होता. त्यांना पुन्हा कार्यकाळ वाढवून मिळणार नाही, असं या पत्रात स्पष्ट म्हटलं आहे.

शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात सुधाकर शिंदे यांना मुंबई महापालिकेत कायम ठेवण्यावरून जबरदस्त आवाज उठवला होता. अखेर त्यांची आता मुळ ठिकाणी रवानगी करण्यात आली आहे.

24 नोव्हेंबर 2015 रोजी सुधाकर शिंदे हे डेप्यूटेशनवर महाराष्ट्रात आले होते. त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2023 ला संपला होता. पण तरीदेखील निवडणुकीपर्यंत त्यांना महापालिकेत कायम ठेवण्यात आले होते. यामुळे कार्यकाळ संपूनही संबंधित अधिकारी अजूनही महाराष्ट्रात कसे? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. विधानपरिषदेत हा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला होता.

पत्रात म्हटलं आहे की, ‘तुम्ही 24.11.2015 पासून महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर काम करत आहात आणि तुमचा 08 वर्षांचा मंजूर प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ 23.11.2023 रोजी संपला आहे. पत्र क्रमांक F.No.HRD/CM/152/16/2015-16/2347, दिनांक 26.07.2024 नुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, मनुष्यबळ विकास संचालनालय, वित्त मंत्रालय/महसूल विभागाने कळविले आहे की मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) तुमचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ 23.11.2023 नंतर वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. त्यानुसार तुम्हाला या शासनाकडून तत्काळ प्रभावाने मुक्त करण्यात येत आहे. तुम्ही तुमचा सध्याचा कार्यभार महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्याशी सल्लामसलत करून सोपवू शकता आणि 31.07.2024 पर्यंत तुमच्या पालक केडरमध्ये सहभागी होऊ शकता’.