बिबट्यापासून वाचवण्यासाठी पाळीव प्राण्यांच्या गळ्यात लोखंडी खिळ्यांचे पट्टे

भीमाशंकर, कळसूबाई आणि हरिश्चंद्र गड या तिन्ही अभयारण्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड होत आहे. त्यामुळे या जंगलातील बिबटे, डुकरे, नीलगाईंसह अन्य वन्यप्राण्यांनी नागरी वस्त्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांची गुरे आणि कुत्रे यांना जंगली प्राण्यांनी लक्ष्य केले आहे. या पाळीव प्राण्यांचे जंगली प्राण्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या गळ्यात टोकदार खिळे असलेला पट्टा बांधला आहे. बिबट्याचा हल्ला हा मानेवरच होत असून या काटेरी पट्टयामुळे पाळीव प्राण्यांचा जीव वाचत आहे.

माळशेज घाट ते गोरखगड या परिसरातील हजारो हेक्टर भूभागात तालुक्यातील 75 गावांचे क्षेत्र आहे. जंगलतोड आणि पाण्याचे झरे आटल्यामुळे या अभयारण्यातील वन्यप्राणी पाणी व अन्नाच्या शोधात गाव, वाडीवस्तीवर येतात. त्यातच वनविभागाबाहेरील हिंख बिबटे आणि अन्य वन्यप्राणी इतर ठिकाणाहून रेस्क्यू ऑपरेशन करून पकडून आणून या अभयारण्यात सोडत आहेत. या मांसभक्ष्यी प्राण्यांना खाण्यालायक इतर वन्यप्राणी नसल्याने त्यांनी आता शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना लक्ष केले आहे.

नरडीचा घोट घेता येणार नाही

बिबट्या कुत्र्याच्या मानेवर हल्ला करतो. या हल्ल्यातून बचाव करता यावा यासाठी लोखंडी खिळे असलेला पट्टा त्याच्या गळ्यात बांधला जात आहे. त्यामुळे नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केल्यास बिबट्यालाच दुखापत होईल आणि आमच्या पाळीव प्राण्यांचा जीव वाचेल असे उंबरवाडीचे आदिवासी शेतकरी नवसू पारधी यांनी सांगितले.