मुंबई, ठाण्यात इराणी, नायजेरियन टोळ्यांचा धुडगूस; पोलिसांवरही हल्ले, सरकार मोक्काची कारवाई करणार

मुंबई, ठाण्यात इराणी, नायजेरियन गँगचा धुडगूस सुरू असून या टोळ्यांची हिंमत एवढी वाढली आहे की, या टोळ्या पोलिसांवरही हल्ला करतात. त्यामुळे या टोळ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, त्याचबरोबर परराज्यातील गुंड येथे येऊन आश्रय घेत आहेत त्यावर राज्य सरकारने ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी प्रश्नोतराच्या तासाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, प्रवीण दरेकर यांनी केली होती. दरम्यान, इराणी, नायजेरियन टोळ्या आणि वस्त्या उद्ध्वस्त केल्या जातील. त्यासाठी शोधमोहीम राबवली जाईल, संघटितपणे कारवाई करणाऱ्या या टोळ्यांतील गुंडांना मोक्का लावला जाईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले असतानाच आता सत्ताधारी सदस्यांनीही राज्य सरकारला राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. प्रवीण दरेकर यांनी याबाबत प्रश्न विचारून सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ठाणे जिह्यात कल्याण-कसारा मार्गावरच्या आंबिवलीत सुमारे दोन हजार वस्तीची इराणी टोळी कार्यरत असून या टोळीने पोलिसांवर प्राणघातक हल्ले केले आहेत. गुन्हेगारच पोलिसांवर प्राणघातक हल्ले करतात इतकी त्यांची दहशत आहे. टोळीतील महिलाही पोलिसांना आडव्या येतात आणि गुन्हेगारांना पळून जाण्यास मदत करतात. तेथे महिलांकडून पोलिसांवर हल्ला करण्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी दरेकर यांनी केली. दरम्यान, 2018 पासून येथे पोलिसांवर पाच हल्ले झाले आहेत. न्यायालयातही हे गुन्हे प्रलंबित आहेत. त्यामुळे पोलीस आणि प्रॉसिक्युटर ही आपली यंत्रणा प्रभावित असली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

गँगस्टरप्रमाणे हे अड्डे मोडून काढा!  

मुंबई-ठाण्यात इराण्यांबरोबर नायजेरियन वस्त्यांही वाढत आहेत. जास्त भाडे देऊन जागा घेतात आणि तेथून ड्रग्जचा धंदा मोठय़ा प्रमाणात करतात. मीरा रोडमध्ये मोठय़ा प्रमाणात नायजेरियन वस्ती आहेत. त्यांचे असे धंदे उद्ध्वस्त केले नाहीत तर आपली पुढची बरबाद होईल. म्हणून पोलीस दल शस्त्रास्त्राने मजबूत करून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची गरज आहेत. गँगस्टरचे अड्डे मोडून काढता, तसे ड्रग्स सप्लायर्सचे अड्डे मोडून काढा, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

नवी मुंबई, रायगडमध्ये नायजेरियनचे अड्डे      

मीरा रोडचे नायजेरियन अड्डे आपण कमी केले आहेत. आता ते नवी मुंबई, रायगडकडे गेले आहेत. आता अनधिकृत बांधकामांचा आसरा घेऊन इराणी वा नायजेरियन लोक असे उद्योग करत असतील तर त्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला जाईल. मुंबई पोलीस हे कारवाई करण्यात जगात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते घाबरून कारवाई करत नाहीत असे नाही. मुंबईत येऊन जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतीत आश्रय घेणाऱ्या परराज्यातील गुंडांची शोधमोहीम घेऊन यांचे उच्चाटन करण्यात येईल, असे योगेश कदम यांनी सांगितले.

मुलांना गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करणाऱ्यांनाही गुन्हेगार ठरवले जाईल 

आंबिवलीत येथे आठ ते दहा पिढय़ांपासून इराणी वस्ती आहे. पोलीस जेव्हा आरोपीला पकडण्यासाठी जातात तेव्हा महिला आक्रमक होत पोलिसांवर हल्ला करतात. या संपूर्ण वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येईल, ऑलआऊट ऑपरेशन करण्यात येईल. येथील गुन्हेगारांवर मोक्कासारखे गुन्हे दाखल करण्यात येतील. इराणी वस्त्या देशभर पसरलेल्या आहेत. एके ठिकाणी गुन्हा घडल्यावर ते अन्य राज्यात फरार होतात. तिथे दोन दोन तीन-तीन वर्षे राहतात. त्याचबरोबर लहान मुलांनाही गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगार आणि महिलांनाही गुन्हेगार ठरवून त्यांना मोक्का लावला जाईल, असे गृह राज्यमंत्री म्हणाले.