वेब न्यूज- रोबोट चंपक

आयपीएल स्पर्धा सध्या ऐन भरात आलेली आहे. प्रत्येक सामना रोमांचक होतो आहे आणि त्याला प्रेक्षकांचादेखील भरभरून प्रतिसाद लाभत आहे. प्रत्येक मैदान प्रेक्षकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. आयपीएल स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या नावीन्यपूर्ण सादरीकरणामुळे चर्चेत असते. स्पर्धेत भाग घेणारे देशविदेशातील प्रसिद्ध खेळाडू, अनुभवी आणि मार्मिक समालोचक, चीअर गर्ल्स आणि या स्पर्धेचे दिमाखदार सादरीकरण हा कायम चर्चेचा विषय असतो. या वेळीदेखील ही स्पर्धा एका अनोख्या गोष्टीमुळे चर्चेत आहे आणि ती गोष्ट म्हणजे या वर्षी स्पर्धेच्या ब्रॉडकास्ट टीममध्ये नव्याने दाखल झालेला आयपीएल रोबोट डॉग चंपक होय. प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील चंपकलाल या पात्राच्या नावावर या रोबोट डॉगचे नाव प्रेरित आहे. आयपीएल चाहत्यांनी मतदान करून हे नाव निवडले आहे. हा रोबोटिक डॉग आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारलेला असून तो अनेक गोष्टी करू शकतो. मैदानाच्या प्रत्येक भागात तो सहजतेने वावरत असल्याने, त्याच्यात बसविलेल्या पॅमेऱयातून प्रेक्षकांना ‘डॉग आय ह्यू’ या एका वेगळ्या आणि अनोख्या नजरेने सामन्याचा आनंद घेता येतो. चंपक खेळाडूप्रमाणे धावतो, हातपाय हलवतो आणि पुढच्या दोन पायांनी हृदयाचा आकारदेखील बनवतो. सध्या चंपकचा खेळाडूंच्या सोबतीने व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये चंपक खेळाडूंसोबत धावताना आणि स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडलेला आहे. आयपीएलमध्ये सध्या चंपकची तुफान चर्चा होताना दिसत आहे आणि ही नवी टेक्नॉलॉजी लोकांच्या पसंतीला उतरल्याचेदेखील दिसत आहे. अमेरिकन पंपनी बोस्टन डायनामिक्सने बनवलेल्या चार पायांच्या रोबोटवरून प्रेरणा घेऊन चंपकची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे चार पायांचे रोबोट सैन्याला खूप मदत करतात. सैनिकांच्या सामानाचे ओझे वाहणे, दुर्गम ठिकाणी चढणे, निगराणी करणे अशा कामांसाठी हे रोबोट खूप उपयुक्त ठरतात.

> स्पायडरमॅन