
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव करीत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत तिसरा विजय मिळविला. कोलकात्याला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. इम्पॅक्ट प्लेअर मिशेल मार्श व निकोलस पूरन यांच्या वादळी अर्धशतके व दिग्वेश राठीची पंजूष गोलंदाजी या विजयात निर्णायक ठरली. ‘सामनावीरा’ची माळ निकोलस पूरनच्य गळय़ात पडली.
अजिंक्य–व्यंकटेशचा प्रतिकार
लखनौकडून मिळालेल्या 239 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याला 7 बाद 234 धावसंख्येपर्यंत मजल मारता आल्याने त्यांना घरच्या मैदानावर निसटता पराभव पत्करावा लागला. क्विंटॉन डिकॉक (15) व सुनील नरिन (30) यांनी 15 चेंडूंत 37 धावांची संक्षिप्त पण वेगवान सलामी दिली. आकाश दीपने डिकॉकला पायचीत पकडले, तर दिग्वेश राठीने नरिनला मार्करमकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे (61) व व्यंकटेश अय्यर (45) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 40 चेंडूंत 71 धावांची भागीदारी करीत कोलकात्याच्या आशा पल्लवित केल्या, मात्र शार्दुल ठाकूरने 13 व्या षटकांत अजिंक्य रहाणेची विकेट काढली.
मधल्या फळीने सामना घालवला!
रहाणे बाद झाल्यानंतर रमनदीप सिंग (1) व अंगक्रिष रघुवंशी (5) अपयशी ठरल्याने कोलकात्याच्या फलंदाजीवर काहीसे दडपण आले. मग आकाश दीपने व्यंकटेश अय्यरला झेलबाद करून कोलकात्याची 6 बाद 177 अशी अवस्था केली. त्यानंतर बलदंड आंद्रे रस्सेलला (7) शार्दुल ठाकूरने मिलरकरवी झेलबाद करून लखनौला मोठे यश मिळवून दिले. या अपयशी ठरलेल्या कोलकात्याच्या मधल्या फळीने हा हातात आलेला सामना घालविला. रिंकू सिंगने (नाबाद 38) व हर्षित राणाच्या (नाबाद 10) साथीत विजयासाठी सर्वस्व पणाला लावले. त्याने 15 चेंडूंत 6 चौकार अन् 2 षटकार ठोकले. अखेरच्या क्षणी त्याने दोन चौकार व एक षटकार लगावला, पण तोपर्यंत थोडा उशीर झालेला होता.
मार्करम, मार्श, पूरनची फटकेबाजी
दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने 3 बाद 238 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. एडेन मार्करम (47) व इम्पॅक्ट प्लेअर मिशेल मार्श (81) यांनी 99 धावांची खणखणीत सलामी देत लखनौला झकास सुरुवात करून दिली. मार्करमने 28 चेंडूंत 4 चौकारांसह 2 षटकार ठोकले, तर मार्शने 48 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांचा घणाघात केला. हर्षित राणाने मार्करमचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. मात्र निकोलस पूरन फलंदाजीला आला अन् कोलकात्याच्या गोलंदाजांची फुफाटय़ातून निघून आगीतून पडल्यागत अवस्था झाली. कारण मार्श व पूरन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 30 चेंडूंत 71 धावांची लयलूट केली. आंद्रे रस्सेलने मार्शला रिंकू सिंगकरवी झेलबाद करून ही डोकेदुखी ठरलेली जोडी पह्डली, मात्र निकोलस पूरनने आज चौफेर फटकेबाजी करीत कोलकात्याच्या क्षेत्ररक्षकांना अक्षरशः पुतळे बनविले. अब्दुल समदला (6) हर्षित राणाने त्रिफळाबाद केल्यानंतरही पूरनवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याच्या 36 चेंडूंतील नाबाद 87 धावांच्या खेळीला 8 टोलेजंग षटकार व 7 सणसणीत चौकारांचा साज होता. डेव्हिड मिलर 4 धावांवर नाबाद राहिला. पूनरच्या दे दणादण फलंदाजीमुळे लखनौने सहजपणे सवादोनशे धावांचा टप्पा ओलांडला.