आयपीएलची फटकेबाजी 14 मार्चपासून, पुढील तीन वर्षांत 73 दिवस रंगणार आयपीएलचा थरार

आजपासून पर्थवर बॉर्डर-गावसकर (बॉगाक) करंडकाचा थरार सुरू झालेला असतानात बीसीसीआयने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना आणखी एक आनंदाची बातमी दिलीय. बीसीसीयाने आयपीएलच्या 2025, 2026 आणि 2027 या पुढील तीन हंगामाच्या तारखा जाहीर केल्या असून 2025 चा हंगाम 14 मार्च ते 25 मे या कालावधीत रंगणार आहे.

सध्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष हे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयपीएलच्या लिलावाकडे लागले आहे. कोणत्या संघात कोणता खेळाडू समाविष्ट होतो याची उत्सुकता शिगेला पोहचलीय. त्यातच बीसीसीआयने आयपीएलच्या तारखा जाहीर केल्याने आनंद द्विगुणीत झालाय. एका क्रिकेट वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलची 2025 ही स्पर्धा 14 मार्च ते 25 मे या कालावधीत रंगणार आहे. तर, आयपीएल 2026 ची स्पर्धा 15 मार्च ते 31 मे या कालावधीत रंगणार आहे. आयपीएल 2027 ची स्पर्धा 14 मार्च ते 30 मे या कालावधीत पार पडणार आहे. आयपीएलच्या आगामी हंगामामध्ये 74 सामने खेळले जाणार असून, 2026 आणि 27 च्या हंगामात 84 सामने खेळले जाण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे की, त्यांचे खेळाडू 2025 आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील. फक्त 2027 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मार्चमध्ये होणाऱ्या एका कसोटी सामन्यानंतर खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध असतील. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, श्रीलंका या संघांनीही खेळाडू उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. बांगलादेशनेही 13 खेळाडूंची नावे पाठवली आहेत, जे तीन वर्षांसाठी आयपीएल खेळण्यास उपलब्ध असणार आहेत.

24 आणि 25 नोव्हेंबरला मेगा लिलाव

24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरबमधील जेद्दाह येथे आयपीएलचा लिलाव होणार आहे. मेगा लिलावात अनेक मोठी नावे सहभागी करण्यात आली आहेत. यात ऋषभ पंत, केएल राहुल, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांसारखे मोठे खेळाडू लिलावात उतरतील. त्याचबरोबर विदेशी खेळाडूंमध्ये ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, जोस बटलर, डेव्हिड वॉर्नर, जेम्स अॅण्डरसन, ट्रेंट बोल्ट, फाफ डु प्लेसिस, जोफ्रा आर्चरचाही समावेश आहे.

हे खेळाडू असतील उपलब्ध

2025 आणि 2027 दरम्यान पूर्णपणे उपलब्ध असलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, जोस बटलर, ब्रायडन कार्स, झॅक क्राऊली, सॅम करण, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन यांचा समावेश आहे. ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, ऑली स्टोन आणि रीक टोपले यांचाही समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे की यातील काही खेळाडू 2025-27 या कालावधीत काही काळांसाठी कराराच्या बाहेर होतील, परंतु जेव्हा ते करारबद्ध असतील तेव्हा ते आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असतील, असेही ईसीबीने स्पष्ट केले आहे.