
आयपीएल- 2025 चा सीझन येत्या 2 दिवसांत सुरू होणार आहे. सर्वच चाहते आयपीएलमधील या 10 संघांचे घमासान पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. पहिलाच सामना आरसीबी आणि केकेआर यांच्यात 22 मार्चला होणार आहे. विराट कोहलीचा संघ आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात खेळताना दिसणार आहे. दरम्यान, विराट कोहलीचा अंडर-19 संघातील सहकारी खेळाडू आयपीएलमध्ये अम्पायरिंग करताना दिसणार आहे.
विराट कोहलीबरोबर विश्वचषक जिंकणारा फलंदाज आता आयपीएल-2025 मध्ये अम्पायरिंग करताना दिसणार आहे. 2008 मध्ये हिंदुस्थानच्या अंडर-19 संघाचे विश्वचषक जिंकल्यानंतर कोहली प्रसिद्धीच्या झोतात आला. कोहली व्यतिरिक्त, रवींद्र जडेजा आणि मनीष पांडे हे देखील विजयी संघाचा भाग होते, जे अजूनही सक्रिय खेळाडू आहेत. पण हिंदुस्थानला अंडर-19 विश्वचषक जिंकून देण्यात सर्वात मोठी भूमिका तन्मय श्रीवास्तवची होती, ज्याने टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक 262 धावा केल्या होत्या. इतकेच नव्हे तर अंतिम सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण 43 धावांची खेळी केली होती.
सहकारी खेळाडूंचा आभारी
मी 11 वर्षांचा असताना ग्रीन पार्क क्रिकेट हॉस्टेलमध्ये क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी सामील झालो, तेच माझे एकमेव ध्येय होते. 13 व्या वर्षी मी हिंदुस्थानचे अंडर-15 संघाचे प्रतिनिधित्व केले आणि जेव्हा मी हिंदुस्थान संघाची जर्सी घातली तेव्हा ते स्वप्न पूर्ण झाले. 2008 मध्ये अंडर-19 विश्वचषक विजेते ठरलो आणि राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवतानाच्या आठवणी अजूनही अभिमान वाटणाऱ्यासारख्या आहेत. हिंदुस्थान आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडूंसह खेळल्याबद्दल आणि त्यांच्याबरोबर ड्रेसिंग रूम शेअर केल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आजही त्यापैकी बहुतेक जण फक्त एका फोनच्या अंतरावर आहेत आणि मला शिकण्यास मदत करण्यासाठी त्यांचे अनुभव शेअर करत आहेत याबद्दल मी आभारी आहे, निवृत्ती घेताना तन्मय म्हणाला.
आयपीएल खेळणारा आणि अम्पायरिंग करणारा पहिला खेळाडू
दरम्यान, आयपीएलमध्ये खेळणारा आणि अम्पायरिंग करणारा तन्मय श्रीवास्तव पहिला खेळाडू ठरला आहे. 2008 आणि 2009 मध्ये तन्मय श्रीवास्तव हा पंजाब किंग्जच्या संघात होता. त्याने 3 लढतीत फक्त 8 धावा केल्या होत्या.