
पहिल्या सामन्यात जोरदार विजय मिळवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या रथाची चाके उलट्या दिशेने फिरू लागली आहेत. 300 धावांचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य असलेल्या या संघाची सलग चार पराभवांमुळे गुणतालिकेत शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे. त्यामुळे तुफान फॉर्मात असलेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात हैदराबादची रूळावरून घसरलेली गाडी पुन्हा विजयाचा मार्ग पकडते का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. हैदराबाद पंजाबविरुद्धही हरला तर हा त्यांच्यासाठी एक हादराच असेल. त्यांचे साखळीतच बाद होण्याचे संकट अधिक गहिरे होईल.
पहिल्या सामन्यात हैदराबादने पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 286 धावा केल्या. हा सामना हैदराबादने 44 धावांनी जिंकला. मात्र, दुसऱ्या सामन्यापासून हैदराबादच्या संघाला नजर लागली. सलग चार सामन्यात फलंदाजीच्या अपयशामुळे हैदराबादला पराभव पत्करावा लागला. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या हैदराबादला गेल्या चार सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही.
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासनसारखे स्फोटक फलंदाज असूनसुद्धा त्याचा संघ अडचणीत सापडला आहे. सलामीसह मधल्या फळीमध्येही धावांचा दुष्काळ असल्यामुळे त्यांची अवस्था फारच बिकट झालीय. फलंदाजीबरोबर गोलंदाजीदेखील हैदराबादसाठी चिंतेची बाब बनली आहे. हैदराबादचे प्रमुख गोलंदाज खूप साऱ्या धावा लुटत असल्याने सामन्यावरची पकड ढिली होत आहे. पॅट कमिन्स, मोहम्मद शमी आणि हर्षल पटेलसारखे गोलंदाज अद्याप प्रभाव पाडू शकलेले नाहीत.
हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी म्हणाले, अपयश येत असले तरी संघ आक्रमक शैली सोडणार नाही. मात्र, आम्हाला परिस्थितीचा आदर करून त्यानुसार खेळ करावा लागेल. दरम्यान, पंजाबविरुद्ध घरच्या मैदानावर विजय मिळवून पराभवाची मालिका खंडीत करण्याची संधी हैदराबादकडे असणार आहे. मात्र, पंजाब किंग्ज कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे.
प्रियांश आर्यच्या रूपात एक स्फोटक सलामीवीर पंजाबला मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावल्याने प्रियांशचे मनोबल उंचावलेले आहे. पंजाबच्या गोलंदाजी विभागात अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युजवेंद्र चहल आणि मार्को यानसेन यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात हैदराबादपुढे पंजाबचे तगडे आव्हान असेल.