
सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी धुव्वा उडवित आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत जोरदार विजयी सलामी दिली. इशान किशनची शतकी खेळी या विजयात निर्णायक ठरली. हैदराबादच्या बहुतांश फलंदाजांनी दोनशेहून अधिक स्ट्राईक रेटने धावा फटकाविल्याने हैदराबादला हा विजय मिळविता आला. ‘सामनावीरा’ची माळ अर्थातच इशान किशनच्या गळय़ात पडली.
हैदराबादकडून मिळालेल्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला 6 बाद 242 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. यशस्वी जैस्वाल (1) दुसऱयाच षटकात बाद झाला अन् येथेच राजस्थानचे मनोबल डळमळीत झाले. त्यातच कर्णधार रियान पराग (4) व नितीश राणा (11) लवकर बाद झाल्याने राजस्थानची फलंदाजी दबावात आली, मात्र अनुभवी संजू सॅमसन (66), ध्रुव ज्युरेल (70), सिमरॉन हेटमायर (42) व शुभम दुबे (नाबाद 34) यांनी हैदराबादच्या गोलंदाजीचा जोरदार प्रतिकार करीत राजस्थानला 242 धावसंख्येपर्यंत पोहोचविले. दुबेने 11 चेंडूंत 4 षटकार व एका चौकारासह नाबाद 34 धावांची वादळी खेळी केली, पण तोपर्यंत राजस्थानच्या हातातून विजय निसटलेला होता. हैदराबादकडून सिमरजीत सिंग व हर्षल पटेल यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर मोहम्मद शमी व अॅडम झम्पा यांना 1-1 विकेट मिळाली.
आयपीएलच्या टॉप-5 धावसंख्येत चार वेळा हैदराबादच
सनरायझर्स हैदराबादने रविवारी (दि. 23) 6 बाद 286 धावा करीत आयपीएलच्या इतिहासातील दुसऱया क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा पराक्रम केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक (3 बाद 287) धावसंख्या उभारण्याचा विक्रमीही हैदराबादच्याच नावावर आहे. त्यांनी गतवर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध हा विक्रम केला होता. तिसऱया (3 बाद 277) क्रमांकाच्या धावसंख्येचा पराक्रमही हैदराबादच्याच नावावर आहे. या क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर 7 बाद 272 धावसंख्या आहेत. त्यानंतर पाचव्या क्रमांकाची (7 बाद 266) सर्वोत्तम धावसंख्याही हैदराबादच्याच नावावर आहे. म्हणजे आयपीएलच्या टॉप-5 धावसंख्येत हैदराबादचाच संघ चार वेळेस आहे, हे विशेष.
पहिल्या शतकाचा मान इशानला
सेट झालेल्या इशान किशनने नाबाद 106 धावांची खेळी करत यंदाच्या आयपीएलमधील पहिले शतक ठोकण्याचा बहुमान मिळविला. त्याने नितीश कुमार रेड्डी (30), हेन्रीक क्लासेन (34) यांना हाताशी धरून हैदराबादला पावणेदोनशे पार नेले. इशानने 47 चेंडूंत 11 चौकार व 6 षटकारांचा घणाघात करीत आपली नाबाद शतकी खेळी सजविली. नितीश कुमारने 15 चेंडूंत 30 धावा फटकाविताना 4 चौकार अन् एक षटकार लगावला, तर क्लासेनेही 14 चेंडूंत 5 चौकार व एक षटकार ठोकला. अखेरचे दोन फलंदाज सोडल्यास हैदराबादच्या सर्वच फलंदाजांनी दोनशेहून अधिक स्ट्राईक रेटने धावांची लयलूट केली. राजस्थानकडून तुषार देशपांडेने 3, तर महिश तिक्षणाने 2 फलंदाज बाद केले. याचबरोबर संदीप शर्माला एक विकेट मिळाली.
पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी
दरम्यान, नाणेफेकीचा काwल जिंकून सनरायझर्स हैदराबादला फलंदाजीचे निमंत्रण देण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सच्या चांगलाच अंगलट आला. हैदराबादने राजस्थानच्या सर्वच गोलंदाजांना चोप देत 286 धावसंख्या उभारून आयपीएलच्या इतिहासातील दुसऱया क्रमांकाचा सर्वाधिक धावांचा पराक्रम केला. अभिषेक शर्मा (24) व ट्रव्हिस हेड (67) यांनी 19 चेंडूंत 45 धावांची जोरदार सलामी दिली. 11 चेंडूंत 5 चौकार ठोकणाऱया अभिषेकला महिश तिक्षणाने जैस्वालकरवी झेलबाद करून राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. मात्र त्यानंतर हेडने आलेल्या इशान किशनच्या साथीत पुन्हा एकदा राजस्थानच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. या दोघांनी 39 चेंडूंत 85 धावांची लयलूट केली. हेडने 31 चेंडूंत 9 सणसणीत चौकारांसह 3 टोलेजंग षटकार लगावले. तुषार देशपांडेने हेटमायरकरवी त्याला झेलबाद करून हैदराबादला दुसरा धक्का दिला, मात्र पॉवर प्लेच्या 6 षटकांत हैदराबादने 94 धावसंख्येपर्यंत मजल मारली.