IPL 2025 – पाय फ्रॅक्चर झाला पण जिद्द नाही, राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविड टीमसाठी उतरला मैदानात

चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. IPL 2025 चा 18 वा हंगाम 22 मार्च पासून सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वच संघांनी आता कंबर कसून सरावाला सुरुवात केली आहे. एकीकडे अवघ्या काही दिवसांवर स्पर्धा येऊन ठेपली आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स (RR) संघाला मोठा झटका बसला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अशाही परिस्थिती त्यांनी संघाला प्रशिक्षण देण्यात खंड पाडलेला नाही. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुखापतग्रस्त राहुल द्रवीडची क्रिकेटप्रती असणारी बांधिलकी पाहून चाहत्यांनाही आनंद झाल आहे. तसेच राहुल द्रविडचं कौतुक केलं जात आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या ट्वीटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये राहुल द्रवीड पाय फ्रॅक्चर असताना सुद्धा मैदानावर दाखल झाला असून खेळाडूंना प्रशिक्षण देताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच चाहत्यांनी सुद्धा या व्हिडीओला चांगला प्रतिसाद देत राहुल द्रवीडचे कौतुक केलं आहे.

कर्णधार संजू सॅमसमनच्या नेतृत्वात राजस्थानचा संघ मैदानात उतरणार आहे. राजस्थानचा पहिला सामना 23 मार्च रोजी सनराझर्स हैदराबादविरुद्ध खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सने 2008 साली आयपीएलच्या पहिल्याच हंगामात विजयश्री खेचून आणला होता. परंतु त्यानंतर त्यांना आयपीएलचे विजेतेपद पटकावता आले नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात विजेतेपद पटकावण्यासाठी संघ सज्ज झाला आहे.