
मिचेल स्टार्कने टाकलेले शेवटचे अद्भुत षटक आणि त्यात राजस्थानच्या दिग्गज फलंदाजांना केवळ 8 धावा देत सामना बरोबरीत सोडवला आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये राजस्थानच्या 2 फलंदाजांना धावचीत करून केवळ 10 धावांत रोखत स्टार्कने दिल्लीच सुपर असल्याचे दाखवून दिले. 11 धावांचे आव्हान दिल्लीच्या केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्जने 4 चेंडूंतच गाठले आणि दिल्लीला मोसमातील पाचवा विजय मिळवून देत गुणतालिकेत अक्वलस्थानी विराजमान केले.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक पोरेलच्या 49 धावा आणि त्यानंतर केएल राहुल (38), ट्रिस्टन स्टब्ज (34) आणि अक्षर पटेल (34) यांच्या उपयुक्त खेळींमुळे दिल्लीला 5 बाद 188 अशी आव्हानात्मक मजल मारून दिली होती. त्यानंतर 189 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला यशस्वी जैसवाल (51) आणि संजू सॅमसन (31) यांनी 61 धावांची सलामी देत सामन्यावर आपले नियंत्रण राखले. पण पायाचे स्नायू दुखावल्यामुळे संजूला 31 धावांवरच निवृत्त व्हावे लागले. त्यानंतर जैसवालने आपली फटकेबाजी कायम राखत राजस्थानला विजयाच्या ट्रकवर आणले. आज रियान पराग (8) अपयशी ठरला, पण पुढे नितीश राणाने खणखणीत खेळी करत 28 चेंडूंत 51 धावा ठोकल्या आणि राजस्थानला विजयासमीप नेले. शेवटच्या षटकात राजस्थानला केवळ 9 धावांची गरज होती. विजय त्यांचाच होता. मात्र मिचेल स्टार्कने भन्नाट मारा करत हेटमायर आणि जुरेलला केवळ 8 धावाच काढू दिल्या आणि सामना अनपेक्षितपणे बरोबरीत सोडवला. शेवटच्या षटकातील अचूक माऱयानंतर स्टार्कने सुपर ओव्हरमध्येही भेदक मारा करत राजस्थानला 10 धावांत रोखले. त्याचा हाच मारा विजयाचा शिल्पकार ठरला.