
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर पार पडलेलल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यात लखनऊने 5 विकेटने हैदराबादचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 191 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने दिलेले आव्हान लखनऊच्या फलंदाजांनी 23 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले आणि हंगामातील पहिला विजय साजरा केला. सलामीला आलेल्या मिचेश मार्शने 31 चेंडूंमध्ये 52 धावा आणि निकोलस पुरनने 26 चेंडूंमध्ये 70 धावा चोपून काढत संघाच्या विजयाचा पाया रचला.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु लॉर्ड शार्दुल ठाकूरने हैदराबादच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. चार षटकांमध्ये 34 धावा देत शार्दुलने चार तगडे झटके हैदराबादला दिले. यामध्ये शतकवीर ईशान किशन आणि अभिषेक शर्मा या विस्फोटक फलंदाजांचा समावेश आहे. ट्रेव्हिस हेड (47 धावा), नितीश कुमार रेड्डी (32 धावा), क्लासेन (26 धावा) आणि अनिकेत वर्मा (36 धावा) यांनी केलेल्या संयमी फलंदाजीमुळे हैदराबदाला 190 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. लखनऊकडून शार्दुलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर आवेश खान, दिग्वेश सिंग, रवी बिश्नोई आणि प्रिंन्स यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.