रोहितच्या तालमीत तयार झाला, पठ्ठ्याने हैदराबादमध्ये राडा घातला; ईशान किशनने 45 चेंडूत शतक ठोकले

रोहित शर्माच्या तालमीमध्ये तयार झालेला टीम इंडियाचा डावखुरा खेळाडू ईशान किशन याने सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पदार्पणाच्या लढतीतच शतकी खेळी केली आहे. रविवारी राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळताना ईशान किशन याने अवघ्या 45 चेंडूंमध्ये शतकी धमाका केला. दहा चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी करत ईशान किशन 106 धावा काढून नाबाद राहिला. त्याच्या या खेळीच्या बळावर हैदराबादच्या संघाने 20 षटकांमध्ये 286 धावा केल्या.

गेल्या हंगामापर्यंत ईशान किशन मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. मात्र त्याला विशेष कामगिरी करता न आल्याने मुंबई इंडियन्सने रिटर्न केले नाही. मेगा ऑप्शन मध्ये सनरायझर्स हैदराबाद त्याला तब्बल 11.25 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले होते. टीम बदलली आणि ईशान किशनचे नशीबही बदलले. पहिल्याच लढतीत त्याने शतक ठोकले आणि आपली निवड सार्थ ठरवली.