
आयपीएल सुरू होताच इम्पॅक्ट प्लेअरचा झंझावात दिसू लागल्याने षटकारोत्सवालाही प्रारंभ झाला आहे. चौकारांपेक्षा षटकारच सर्व फलंदाजांची पहिली पसंती असल्यामुळे गेल्या पाच सामन्यांतच 119 षटकार खेचले गेले आहेत. म्हणजेच प्रत्येक सामन्याला 23.8 षटकार ठोकण्यात आले आहेत. षटकारांचा हाच वेग पुढेही कायम राहिला तर या मोसमात षटकारांचा नवा विक्रम रचला जाणार, हे निश्चित आहे.
2023 सालापासून आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा प्रयोग सुरू झाला आणि आयपीएलमध्ये धावांचे गणितच बदलून गेले. गेल्या मोसमात 250 धावांचे आव्हानही माफक वाटू लागले होते. आताही तशीच परिस्थिती कायम आहे. एवढेच नव्हे तर अब की बार 300 पार असेही संकेत गेल्या पाच सामन्यांतच मिळाले आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये पहिले त्रिशतक कोणता संघ ठोकतो, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.
आयपीएलमध्ये गेल्या मोसमात प्रत्येक सामन्याला किमान 18 ते 20 षटकार मारले गेले होते आणि हीच सरासरी शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे 1260 षटकार मारण्यात आले आणि यात सनरायझर्स हैदराबादने सर्वाधिक 178 षटकार खेचले. हासुद्धा एका संघाकडून एका मोसमात ठोकण्यात आलेल्या षटकाराचा नवा विक्रम आहे. हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात परवा खेळलेल्या सामन्यात एकूण 30 षटकार ठोकले गेले होते. सोमवारी श्रेयस अय्यरने आपल्या 97 धावांच्या नाबाद खेळीत 9 षटकार खेचले तर निकोलस पूरनने 30 चेंडूंत 75 धावा फटकावताना 7 षटकार मारले.
गेल्या तिन्ही मोसमात हजारो षटकार
2022 पासून आयपीएलच्या सामन्यांची संख्या 74 झाली आणि षटकारांच्या आकड्यानेही हजारी गाठली. 2022 च्या मोसमात 1062 षटकार ठोकले गेले होते, तर 2023 मध्ये हा आकडा 1124 पर्यंत पोहोचला. मग हा विक्रम 2024 ने सहजगत्या मागे टाकत 1260 षटकारांचा नवा विक्रम रचला गेला. गेल्या वर्षी दर सामन्याला सरासरी 17 षटकार ठोकले गेले होते. आता पहिल्या पाच सामन्यांत षटकारबाजी तब्बल 24 च्या सरासरीने झालीय. हाच वेग कायम राहिला तर यंदा षटकाराने 1500 हा आकडा गाठला तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही.
गेलचा विक्रम अबाधितच राहणार
आयपीएलमध्ये एका सामन्यात असो किंवा एका मोसमात किंवा कारकीर्दीत ख्रिस गेलचे नाव षटकारबाजीत अव्वल स्थानावरच आहे आणि राहणार. त्याचा हे विक्रम मात्र या मोसमातही कुणी मोडू शकेल असे वाटत नाही. गेलने 2012 साली एका मोसमात 59 षटकार खेचले होते. जो आजही अबाधित आहे. त्याने आयपीएलच्या तीन मोसमात 40 पेक्षा अधिक षटकार ठोकले आहेत. गेल्या मोसमात अभिषेक शर्माने सर्वाधिक 42 षटकार खेचले होते. गेलने आयपीएलच्या इतिहासात 142 सामन्यांत 357 षटकार ठोकलेत. त्याच्या आसपासही कुणी नाही. दुसऱ्या क्रमांकावर 258 सामन्यांत 280 षटकारांसह रोहित शर्मा आहे. यावरून गेलचा झंझावात किती विध्वंसक होता, याची कल्पना आलीच असेल.