IPL 2025 – आयपीएलची आतषबाजी 22 मार्चपासून

आयपीएलच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली आहे. महिनाभरानेच म्हणजे 22 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होत असून ती 25 मेपर्यंत आपला थरार सादर करील. ही स्पर्धा 13 ठिकाणी खेळवली जाणार असल्याचेही आज आयपीएल आयोगाने जाहीर केले. पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जाणार असून तो ऐतिहासिक कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे. याशिवाय दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचबरोबर पाच वेळचे विजेते चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना 23 मार्च रोजी होईल. या स्पर्धेत एकूण 74 सामने खेळविले जाणार आहेत.

क्रिकेट विश्वात सर्वात प्रसिद्ध असलेली ही लीग 13 शहरांत आयोजित केली जाईल. आयपीएलच्या 18 व्या हंगामात  65 दिवसांत एकूण 74 सामने खेळवले जातील. आयपीएल 2025 मध्ये लीग सामने 22 मार्च ते 18 मेदरम्यान खेळवले जातील. यानंतर 20, 21, 23 आणि 25 मे रोजी प्ले ऑफ सामने आयोजित केले जातील. आयपीएल 2025 मध्येही गेल्या वर्षीप्रमाणेच फॉरमॅट आहे. या दोन महिन्यांच्या स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दहा आयपीएल संघ जेथे पदासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील.

आयपीएलचा हा हंगामही 2024 प्रमाणेच खेळविला जाणार आहे. त्यानुसार दहा संघांची दोन गटांत विभागणी केली आहे. प्रत्येक संघ लीग टप्प्यात 14 सामने खेळेल. पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये भिडतील, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाईल. पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत संघ आणि एलिमिनेटरमध्ये जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये भिडेल. येथील विजेता संघ पहिल्या क्वालिफायरमधील विजेत्या संघाविरुद्ध अंतिम फेरीत पोहोचेल.

आयपीएलच्या या हंगामाचे सामने यंदा 13 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक फ्रँचायझीच्या होम ग्राऊंड्सव्यतिरिक्त राजस्थान आणि पंजाब संघ अनुक्रमे गुवाहाटी आणि धर्मशाळा येथेसुद्धा काही सामने खेळले जाणार आहेत.