
तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती धुपाटणे आले अशी म्हण आपल्याकडे म्हटली जाते. ही म्हण तंतोतंत राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याच्यासाठी लागू पडते. बुधवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघामध्ये सामना पार पडला. यात गुजरातने राजस्थानचा 58 धावांनी पराभव केला आणि सलग चौथा विजय मिळवला. या पराभवामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे. या लढतीनंतर राजस्थानला आणखी एक धक्का बसला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या या लढतीत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याला स्लो ओवर रेटमुळे दंड झाला आहे. आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्ट 2.22 नुसार राजस्थानने यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा ही चूक केली आहे. यामुळे संजू सॅमसनला 24 लाखांचा दंड झाला आहे. फक्त संजू सॅमसन नाहीतर राजस्थानच्या प्रत्येक खेळाडूला आर्थिक फटका बसला आहे. इम्पॅक्ट प्लेयर्ससह अंतिम 11 मधील सर्व खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के रक्कम (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) दंड ठोठावण्यात आली आहे.
आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टनुसार एखाद्या संघाने पहिल्यांदा स्लो ओव्हर रेटचा अपराध केल्यास या संघाच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड होतो. दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास 24 लाखांचा दंड होतो, तर तिसऱ्यांदा ही चूक केल्यास डीमेरिट गुण दिला जाईल.
Sai Sudarshan – गेल, हेडचा रेकॉर्ड मोडला; विराट, रोहित जवळपासही नाही, साई सुदर्शनचा ऐतिहासिक कारनामा
या आधी तिसऱ्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला पुढील सामन्यात खेळल्यास बंदी घातली जात होती. याचा फटका मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याला बसला होता. त्यामुळे तो यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळू शकला नव्हता. मात्र यंदा बीसीसीआयने या नियमांमध्ये बदल केला आणि यापुढे स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधारावर बंदी न घालण्याचा निर्णय घेतला.