चेंडूवर ‘लाळ’ मान्य; चेंडूला चकाकी देण्यासाठी लाळ लावण्याची परवानगी, IPL मध्ये नव्या नियमांमुळे गोलंदाजही बाहुबली

कोरोना काळात चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी लादण्यात आली होती, त्यामुळे लाळ मान्य नव्हती. मात्र बीसीसीआयने गोलंदाजांनी केलेल्या विनंतीचा मान राखत आयपीएलमध्ये चेंडूला लाळ लावण्याची परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आयपीएलमध्ये फलंदाजांबरोबर गोलंदाजांनाही बाहुबलीची ताकद लाभली आहे.  बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या बैठकीत सर्व कर्णधारांच्या संमतीने हा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर दुसऱया डावाच्या मध्यावर नवा चेंडू वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलच्या नव्या मोसमात फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांचीही चांदी झाली आहे.

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा म्हटले की, फलंदाजांची चांदी अन् गोलंदाजांची धुलाई ठरलेली असते. मात्र, ‘बीसीसीआय’ने गुरुवारी आपल्या मुंबईतील मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत दोन नव्या नियमांना परवानगी देत गोलंदाजांनाही बलशाली केले आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही समान संधी मिळाल्यास क्रिकेटचा थरार वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे.

22 मार्चपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आयपीएलचे 18 वे पर्व धडाक्यात सुरू होईल. पांढऱया चेंडूने खेळवण्यात येणार्या या टी-20 स्पर्धेत गोलंदाजांना आधीच धावा रोखताना फार संघर्ष करावा लागू शकतो. त्यामुळे माजी क्रिकेटपटूंसह हिंदुस्थानच्या मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा यांसारख्या प्रमुख वेगवान गोलदाजांनी चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यासाठी लाळेचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीने अद्याप यावरील बंदी उठवलेली नसली तरी बीसीसीआयने मात्र आयपीएलसाठी गोलंदाजांना स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे आता गोलंदाज चेंडू चमकवण्यासाठी घाम न वापरता लाळेचा उपयोग करू शकतात.

तीन सामन्यांसाठी रियान राजस्थानचा कर्णधार

आसामचा युवा फलंदाज रियान परागकडे पहिल्या तीन सामन्यांसाठी राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसनने याविषयी माहिती दिली. राजस्थानचा संघ 23 मार्चला हैदराबादविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे. त्यानंतर ते 26 व 30 मार्च रोजी गुवाहाटीत दोन सामने खेळतील. गुवाहाटी हे परागचे घरचे मैदान आहे. गेल्या दोन वर्षांपासून राजस्थानचा संघ गुवाहाटीत घरचे दोन सामने खेळतो, तर त्यांचे उर्वरित पाच सामने जयपूरला होतात. मात्र यंदा सुरुवातीच्या तीन लढतींसाठी पराग कर्णधार असेल, तर सॅमसन फक्त फलंदाज म्हणून खेळेल.

वाईड चेंडूंसाठीसुद्धा रिह्यू

उंचीवर असलेल्या तसेच ऑफस्टम्पबाहेरील वाईड चेंडूसाठी आता संघांना रिह्यू घेण्याची मुभा आहे. यासाठी हॉक आय आणि बॉल ट्रकिंग प्रणालीचा अवलंब केला जाईल. म्हणजेच एखाद्या फलंदाजाला वाटले की चेंडू त्याच्या डोक्यावरून अथवा ऑफ साईडला वाईड रेषेच्या बाहेरून जात असतानाही पंचांनी वाईड दिला नसेल तर तो आता रिह्यू घेऊ शकतो.

सायंकाळच्या सत्रात दोन चेंडू

सायंकाळी रंगणाऱया सामन्यात दुसऱया डावात आता 11व्या षटकानंतर चेंडू बदलण्याची संधी दिली जाणार आहे. म्हणजेच 7.30 वाजता सुरू होणाऱया लढतींमध्ये नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार नाही. बहुतांश मैदानात सायंकाळी प्रचंड दव पडते. त्यामुळे दुसऱया डावात धावांचा पाठलाग करणे सोपे जाते. मात्र आता दुसऱया डावात गोलंदाजी करणारा संघ 11 व्या षटकानंतर नवा चेंडू घेऊ शकतो. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हे दवाची स्थिती पाहून मैदानातील पंच घेतील.

षटकांच्या संथ गतीचा दंड कर्णधाराला नाही

एका हंगामात तीन वेळा षटकांची गती संथ राखल्यास त्या संघाच्या कर्णधाराला पुढील सामन्याला मुकावे लागते. मात्र बीसीसीआयने या हंगामापासून हा नियम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही कर्णधारावर संघाबाहेर बसण्याची वेळ येणार नाही, मात्र त्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे.