राजाच्या फटकेबाजीने प्रजा सुखावली; अपयशी खेळींच्या मालिकेनंतर रोहितचा प्रथमच पाऊणशतकी गारवा

मुंबईच्या राजाच्या फटकेबाजीने मुंबईची प्रजा सुखावली. असह्य उकाडय़ात आनंदाचा गारवा याची डोळा पाहिल्यानंतर मुंबईच्या क्रिकेटप्रेमींनी सुटकेचा निःश्वास सोडला. सलग सहा डावात अपेशी खेळींनी साऱ्यांच्याच टीकेचा धनी ठरलेला रोहित शर्मा आज धोनीच्या संघासमोर धावांचा धनी ठरला. त्याने 76 धावांची अभेद्य तडाखेबंद खेळी करताना सूर्यकुमार यादवच्या (68) झंझावाती खेळीसह 114 धावांची आरपार भागी रचत चेन्नईविरुद्ध 26 चेंडू आणि 9 विकेट राखून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा कायम राहिल्या आहेत तर सहाव्या पराभवाची नामुष्की सोसणाऱ्या चेन्नईवर सलग दुसऱ्यांदा साखळीत गारद होण्याचे संकट ओढावले आहे.

रोहितच्या बॅटने कात टाकली

गेल्या सहा डावात रोहितच्या बॅटमधून 26, 18, 17, 13, 8, 0 अशा निराशाजनक खेळ्या निघाल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर मुंबईचे  चाहतेच नव्हे तर क्रिकेट जगतातील दिग्गजही नाराज झाले होते. गेल्या सहा डावांत तो बेफिकीरपणेच बाद झाल्यामुळे रोहित संपल्याचा आवाजही घुमू लागला होता. पण आज रोहितच्या अपयशाला आयपीएलच्या या हंगामातील सर्वात अपयशी संघाने आधार दिला. जसा बुडत्याला काडीचा आधार. चेन्नईच्या 177 धावांचे आव्हान रोहित-सूर्याच्या झंझावातामुळे अत्यंत खुजे वाटले. रोहितने रायन रिकल्टनच्या साथीने 63 धावांची सलामी दिली. विशेष म्हणजे रोहित शर्मा- रिकल्टन जोडीची पहिलीच अर्धशतकी भागी ठरली. त्यानंतर सूर्याच्या फटकेबाजीने चेन्नईच्या गोलंदाजांना अक्षरशः पोळून काढले. सूर्याने अवघ्या 30 चेंडूंत 5 षटकार आणि 6 चौकारानिशी (म्हणजेच 56 धावा सीमापार चेंडू टोलवत) 68 धावा काढल्या. या आतषबाजीमुळे मुंबईने 16 व्या षटकांत आपल्या चौथ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

चेन्नईची सलामीची जोडी पुन्हा अपयशी

शेक राशीद आणि रचिन रवींद्र चेन्नईच्या डावाला जोरदार सलामी देण्यासाठी मैदानात उतरले, पण ही जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. विशेष म्हणजे दोघांपैकी एकही सलामीवीर मुंबईच्या माऱ्यापुढे उभा राहू शकला नाही. अश्वनीकुमारने रचिनला (5) बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. पण त्यानंतर त्याला जबरदस्त मार पडला. शेक राशीदची संथ खेळी 19 धावांवर सॅण्टनरने संपवली

आयुष म्हात्रेचे स्वप्नवत पदार्पण

मुंबईचा युवा रणजीपटू आयुष म्हात्रेने आज आयपीएल पदार्पण केले. चेन्नईकडून खेळताना त्याने आपल्या पहिल्या चार चेंडूंवर 4, 6, 6 धावा ठोकण्याचा अनोखा पराक्रम केला. गेल्याच सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या पहिल्याच चेंडूंवर षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. तर आज आयुषला पहिल्या चेंडूंवर एकच धाव काढता आली, मात्र पुढील तीन चेंडूंवर चौकार-षटकारांची आतषबाजी करत त्याने दोन पावले टाकली. आयुषने आपली पदार्पणाची खेळी स्वप्नवत करताना 15 चेंडूंच्या झंझावाती खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकताना 32 धावा काढल्या.

जाडेजादुबेने सावरले

आघाडीचे 3 फलंदाज 63 धावांत बाद झाल्यानंतर रवींद्र जाडेजा आणि शिवम दुबेने चेन्नईच्या डावात आणखी बळकटी देत 79 धावांची भागी रचली. दोघांनी अर्धशतके झळकावत आपल्या डावाची धावसंख्या 200 पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही. पहिल्या षटकांत 18 धावांचा मार पडणाऱ्या अश्वनी कुमारच्या दुसऱ्या षटकांत जाडेजा-दुबेने 24 धावा चोपून काढल्या. जसप्रीत बुमराने दुबेचा 32 चेंडूंतील 50 धावांचा झंझावात रोखला आणि मग पुढच्या षटकांत धोनीला (4) मैदानात टिकू दिले नाही. जाडेजाने शेवटच्या षटकांत ओवर्टनच्या मदतीने 16 धावा काढल्यामुळे चेन्नई 176 धावांपर्यंत पोहचू शकली.