रोहितची खेळी एकेका धावेने वाढतेय

आतातरी रोहित खेळशील का असा सवाल तमाम मुंबईकरांनी मुंबईचा राजा रोहित शर्माला विचारला होता. मात्र रोहितने आजही साऱ्यांची काहीशी निराशा केली. त्याला आजही मोठी खेळी करता आली नाही. मात्र त्याची खेळी एकेका धावेने वाढतेय, हीच एक समाधानाची बाब मानावी लागेल.

गेले वर्षभर मोठय़ा खेळीसाठी धडपडत असलेल्या रोहितच्या बॅटला ना कसोटीत सूर सापडतोय, ना वन डे क्रिकेटमध्ये. त्यामुळे बेभरवशाच्या टी-20 मध्ये त्याची बेफिकरी आणि आत्मघातकी खेळ प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरेल अशी माफक अपेक्षा होती, पण रोहितने ती अपेक्षाही पह्ल ठरवली आहे. आपल्या सात सामन्यांत चार पराभव झेलणाऱ्या मुंबईसाठी रोहित सहावेळा सलामीला उतरला, पण त्याची बॅट फारसे काही करू शकली नव्हती. वानखेडेवर रोहित आपल्या षटकारबाजी दाखवेल, असे तमाम क्रिकेटप्रेमींना वाटत होते आणि रोहित चक्क त्यात काहीसा यशस्वी ठरला.

गेल्या पाच डावांत 0, 8, 13, 17, 18 अशा खेळी करणाऱ्या रोहितने आज आपल्या सर्वोच्च खेळीत 8 धावांची भर घालत 26 धावा केल्या. यात 3 षटकारांचा समावेश होता, ही एकच बाब जमेची होती. त्याने सहा डावांत 82 धावा केल्या आहेत. ही धावसंख्या त्याच्या लौकिकास साजेशी नाही. रोहितने गेल्या पाच कसोटीत 0, 8, 18, 11, 3, 6, 10, 3, 9अशा लाजिरवाण्या खेळी केल्या आहेत, तर  चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने 41, 20, 15, 28 आणि 76 अशा खेळी केल्या आहेत.