IPL 2025 – राजस्थान रॉयल्सनं अचानक कर्णधार बदलला; रियान परागकडं नेतृत्व, नेमकं कारण काय?

इंडियन प्रीमियर लीगचा अठरावा हंगाम सुरू होण्यास अवघे दोन दिवस बाकी आहेत. 22 मार्चला पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहेत. एकीकडे याची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी रियान पराग याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. पहिल्या तीन लढतींमध्ये राजस्थानचा संघ रियानच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.

राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना 23 मार्चला होणार आहे. पहिल्या लढतीत राजस्थानचा संघ गेल्या हंगामातील उपविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध मैदानात उतरेल. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होईल. तत्पूर्वी राजस्थानने मोठा निर्णय घेत सुरुवातीच्या तीन लढतींसाठी कर्णधार बदलला आहे. रियान पराग राजस्थानचे नेतृत्व करणार असून संजू सॅमसन हा विशेष फलंदाज म्हणून मैदानात उतरेल आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल.

राजस्थानचा नियमित कर्णधार आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन याला इंग्लंडविरुद्ध टी-20 सामना खेळताना बोटाला दुखापत झाली होती. चॅम्पियन्स ट्रॉ़फीच्या आधी त्याच्या बोटावर शस्त्रक्रियाही झाली होती. तो या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. बीसीसीआयनेही अद्याप यष्टीरक्षणासाठी त्याला क्लीन चिट दिलेली नाही. त्यामुळे राजस्थानचा संघही जास्त जोखीम घेण्यास तयार नाही. म्हणून संजूच्या जागी रियानकडे संघाची धुरा सोपवण्याचा निर्णय राजस्थानच्या मॅनेजमेंटने घेतला. अर्थात सुरुवातीला संजू पहिल्या तीन लढतीत खेळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र आता तो पहिल्या तीन लढतीत फक्त बॅटर म्हणून खेळेल, असे राजस्थानने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, संजू सॅमसन खेळणार असला तरी तो यष्टीरक्षण करणार नाही. अशा परिस्थितीत राजस्थानकडे ध्रुव जुरेल हा एकमेव पर्याय आहे. संजूच्या अनुपस्थितीत जुरेल हा यष्टीरक्षण करताना दिसण्याची शक्यता आहे. जुरेलला राजस्थानने 14 कोटी रुपये मोजून रिटेन केले होते.

बीसीसीआयनं तिजोरी उघडली, टीम इंडियाचे चॅम्पियन्स खेळाडू मालमाल होणार, ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस जाहीर

राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ –

संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग, युद्धवीर सिंह, जोफ्रा आर्चर, वानिंदू हसरंगा, महेश तीक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, कुमार कार्तिकेय, फजलहक फारूकी, आकाश मधवाल, ध्रुव जुरेल

‘मानसिक छळ झाला, अपमानित केलं; पण तो…’, कैफनं सांगितली हार्दिकच्या ‘कमबॅक’ची कहाणी, बायोपिक बनवण्याची मागणी