
बंगळुरूने 17 वर्षांनंतर चेन्नईला चेपॉक किल्ल्यावर चीत करण्याचा पराक्रम केला. उद्घाटनीय सामन्यात गतविजेत्या कोलकात्याला त्यांच्या क्रीडाभूमीवर मात दिल्यानंतर पेटून उठलेला बंगळुरू चेन्नईलाही त्यांच्या चेपॉक किल्ल्यावर पराभूत करणार हे संकेत दिले होते आणि आज रजत पाटीदारच्या शानदार जोरदार नेतृत्वाने ते करून दाखवले. बंगळुरूच्या 197 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे वीर 146 धावांतच धारातीर्थी पडले. बंगळुरूने 50 धावांनी दणदणीत विजयाची नोंद करत सलग दुसरा विजय नोंदवला. 2008 साली झालेल्या पहिल्या आयपीएलमध्ये बंगळुरूने चेन्नईचा चेपॉकवर पाडाव केला होता. त्याची पुनरावृत्ती करायला बंगळुरूला 17 वर्षांची वाट पाहावी लागली.
बंगळुरूचे 197 धावांचे आव्हान चेन्नईला महागात पडणारच होते. पहिल्या सामन्यात मुंबईला 155 धावांत रोखल्यानंतर चेन्नईला विजयासाठी विसाव्या षटकापर्यंत फलंदाजी करावी लागली होती. मात्र आज ते बंगळुरूला रोखण्यात अपयशी ठरले आणि त्यानंतर रचिन रवींद्रचा (41) अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज बंगळुरूच्या आक्रमणाचा धैर्याने सामना करू शकला नाही. आघाडीवीर राहुल त्रिपाठी (5), कर्णधार ऋतुराज गायकवाडला (0)आपल्या पहिल्याच षटकात बाद करून हेझलवूडने आपल्या संघात भरलेला जोश शेवटपर्यंत कायम राहिला. पुढे दीपक हुडा (4), सॅम करन (8) आणि शिवम दुबे (19) हे सारेच अपयशी ठरल्यामुळे 75 धावांत अर्धा संघ गारद झाल्यावर चेन्नईने सामना गमावला होता. त्यानंतर रवींद्र जाडेजा (25) आणि महेंद्र सिंग धोनीने (ना.30) खणखणीत षटकार खेचत आपल्या संघाच्या पराभवाचे दुःख काहीसे कमी केले.
शानदार, जोरदार पाटीदार
फिल सॉल्ट (32) आणि देवदत्त पडिक्कल (27) यांची घणाघाती खेळी आणि सोबतीला विराटच्या 30 चेंडूंतील 31 धावांच्या खेळीने बंगळुरूला 117 धावांपर्यंत नेले, पण संघाच्या धावसंख्येला बुलेटसारखा वेग दिला तो रजत पाटीदारच्या 32 चेंडूंतील 51 धावांच्या खेळीने. त्याच्या या अर्धशतकानेच बंगळुरूला दोनशे धावांच्या मार्गावर नेले. तळाला टीम डेव्हिडने 8 चेंडूंत 3 षटकारांसह 22 धावा केल्यामुळे बंगळुरू 7 बाद 196 धावांपर्यंत पोहोचला. गेल्या सामन्यात चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या नूर अहमदच्या फिरकीने चेन्नईला यश दिले, पण ते बंगळुरूच्या धावांना रोखू शकले नाहीत.