
आयपीएलमध्ये गुरुवारी (10 एप्रिल 2025) रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा धमाकेदार सामना बंगळुरूमध्ये रंगणार आहे. सध्याच्या घडीला दोन्ही संघ तुफान फॉर्मात आहेत. दिल्ली अपराजीत असून बंगळुरून केवळ एकच सामना गमावला आहे. दिल्लीचा विजयरथ बंगळुरू रोखणार का? हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीची तळपती फलंदाजी पाहण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत. तसेच या सामन्यात विराटला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.
विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. गुजरातविरुद्धचा एक सामना वगळता तीन सामन्यांमध्ये त्याने दमदार फलंदाजी केली आहे. कोलकाताविरुद्धच्या (59 धावा) पहिल्या सामन्यात आणि मुंबईविरुद्धच्या (67 धावा) सामन्यात अर्धशतकीय खेळी केली आहे. त्यामुळे विराटचा हाच फॉर्म आजच्या सामन्यातही कायम राहिल्यास तो सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणारा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव फलंदाज ठरणार आहे. त्याने आतापर्यंत 720 चौकार आणि 278 षटकार म्हणजेच एकून 998 चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आहे. म्हणजेच आज होणाऱ्या सामन्यात त्याने दोन चौकार किंवा दोन षटकार ठोकले तर तो 1000 चा आकडा पार करणारा आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरणार आहे.
आयपीएलच्या संपूर्ण इतिहासात अशी कामगरी करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज ठरण्याची शक्यात आहे. त्याचबरोबर या बाबतीत शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 768 चौकार आणि 152 षटकार म्हणजेच एकूण 920 चा आकडा गाठला आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नरचा समावेश असून त्याने 899 चौकार-षटकार ठोकले आहेत. सध्याच्या घडीला दोघेही आयपीएलमध्ये खेळत नाहीयेत. म्हणजेच विराट कोहली याबाबतीत एकमेक किंग असणार आहे.