नुसता येड्यांचा बाजार! विराट कोहलीच्या चाहत्यांनी अभिनेता अर्शद वारसीला झोडपून काढलं, नेमकं प्रकरण काय?

इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून 18व्या हंगामाची झोकात सुरुवात केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला बुधवारी गुजरात टायटन्स संघाने धक्का दिला. गुजरातने बंगळुरूचा 8 विकेट्सने पराभव केला. यंदाच्या हंगामातील हा बंगळुरूचा पहिला पराभव ठरला. या लढतीत बंगळुरुची आघाडीची फळी सपशेल अपयशी ठरली. ‘रनमशीन’ विराट कोहलीही विशेष छाप सोडू शकला नाही. तो अवघ्या 4 धावा काढून बाद झाला.

बंगळुरू विरुद्ध गुजरात लढतीनंतर सोशल मीडियावर एक वेगळेच चित्र दिसले. विराट कोहली याचे चाहते बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी याच्यावर तुटून पडले. विराटच्या चाहत्यांनी अर्शदच्या पोस्टखाली कमेंट करत त्याला चांगलेच सुनावले. या कमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून विराटच्या चाहत्यांचे हसे झाले आहे.

हे वाचा – ‘टायगरचा वारसा जपायचा की…’, ECB चं पत्र मिळताच शर्मिला टागोर व्यथित; ‘पतौडी ट्रॉफी’चा चेंडू BCCI च्या कोर्टात ढकलला

नेमकं प्रकरण काय?

गुजरातविरुद्धच्या लढतीत विराट कोहली 6 चेंडूत 4 धावा काढून बाद झाला. गुजरातचा वेगवान गोलंदाज अर्शद खान याने त्याला प्रसिद्ध कृष्णा करवी झेलबाद केले. यानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांचा अर्शद खान आणि अर्शद वारसी या नावामध्ये गोंधळ उडाला आणि त्यांनी अभिनेता अर्शद वारसी यालाच ट्रोल करायला सुरुवात केली. कोहलीला बाद का केले? असा सवाल त्याच्या चाहत्यांनी अर्शद वारसी याला केला.

दरम्यान, या लढतीत गुजरातने टिच्चून गोलंदाजी करत बंगळुरूला 169 धावांमध्ये रोखले. त्यानंतर 170 धावांचे आव्हान 18व्या षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत मोठा विजय मिळवला. जोस बटलर याने नाबाद 73 धावांची खेळी केली, तर सलामीवीर साई सुदर्शनने 36 चेंडूत 49 धावा चोपल्या. शेर्फन रुदरफोर्ड 18 चेंडूत 30 धावा काढून नाबाद राहिला. तत्पूर्वी मोहम्मद सिराजने 19 धावा देऊन बंगळुरूच्या 3 विकेट्स घेतल्या.

ठुकरा के मेरा प्यार… इकडं ‘मियां मॅजिक’नं RCB ची झोप उडवली, तिकडं मिम्सचा पाऊस पडला; GT नंही हात धुवून घेतला